केंद्रसरकारने पंतप्रधान मोदीसाहेबांच्या दाढीसोबतच चालू असलेली गॅस दरवाढीची स्पर्धा थांबवावी;आता यापुढील आंदोलन पेट्रोलपंपावरील मोदींच्या होर्डिंग्जवर : रुपाली चाकणकर
मुंबई : गॅस सिलेंडरच्या किंमतीत कमालीची वाढ झाल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर शेणाच्या गोव-यांनी चूल पेटवून तीव्र आंदोलन करत निषेध करण्यात आला. महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी वाशिम येथे रस्त्यावर उतरून या चूलींवर भाक-या बनवून मोदी सरकारचा निषेध केला. दरम्यान यापुढील आंदोलन आता पेट्रोलपंपावरील उज्वला गॅस योजनेच्या लावलेल्या मोदींच्या होर्डिंग्जच्या विरोधात असेल असा सज्जड इशारा प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दिला आहे.
गॅस दरवाढीच्या विरोधात दिवसेंदिवस वाढ होत असून त्याबाबत केंद्रसरकार अजिबात संवेदनशील नाही.ही योजना ५ कोटी महिलांपर्यंत पोहोचविण्याची योजना होती.ती पोहोचली की नाही माहीत नाही, पण महिलांना मात्र या दरवाढीने मोदी सरकारने रडवले आहे. त्यांच्या या दरवाढीमुळे महिला वर्गाचे बजेट कोसळले आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने महिलांसाठी कुठल्याही योजना आणल्या नाही. त्यामुळे हे सरकार महिलांच्या विरोधात आहे. शिवाय ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे, तिथे महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात सरकारला आणि आरोपींना पाठीशी घालण्याचे धोरण सरकारने राबवले आहे असा आरोपही रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे.
महिलांसाठी काम करणा-या महाराष्ट्रातीलच काय पण इतर राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे महिलांच्या बाबतीत सरकार अजिबात संवेदनशील नाही तर महिलांच्या विरोधात आहे. यापूर्वी चूल पेटवा आंदोलन केले, त्याबाबतदेखील गंभीर नाही. याउलट आमच्या माताभगिनींच्या कराच्या पैशातून पेट्रोलपंपावर होर्डिंग्ज लावून जाहिरात करत आहे, त्यामुळेच या होडिंग्जच्या विरोधात यापुढील काळात आंदोलन करण्याचा इशाराही रुपालीताई चाकणकर यांनी दिला आहे.