मुंबई : महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱया जलाशयांतील पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झाल्याने, महापालिका क्षेत्रामध्ये सध्या लागू असलेली २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. म्हणजे आता १० टक्के इतकीच पाणीकपात लागू राहणार आहे. दिनांक २१ ऑगस्ट २०२० पासून हा बदल लागू होईल.
काही दिवसांपूर्वी जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याच्या कारणाने महापालिकेतर्फे ५ ऑगस्ट २०२० पासून मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया मुख्य जलस्त्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे आज (दिनांक १९ ऑगस्ट २०२०) एकूण आवश्यक जलसाठ्याच्या ८५ टक्के इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे.
तुलना केल्यास, याचदिवशी ऑगस्ट २०१८ मध्ये ९१.८३ टक्के तर ऑगस्ट २०१९ मध्ये ९४.२८ टक्के इतका जलसाठा होता.
मुंबईचा पाणीपुरवठा दिनांक ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीत ठेवण्यासाठी सध्याची २० टक्के पाणीकपात ही दिनांक २१ ऑगस्ट २०२० पासून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत आहे. ही पाणी कपात महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्या जाणाऱया ठाणे, भिवंडी महापालिका व इतर गावांनादेखील लागू राहणार आहे.