डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआडः बाळासाहेब थोरात


मुंबई, :  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना थोरात म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. ते यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचे सहकारी होते. त्यांच्या सक्रिय राजकीय जीवनात महाराष्ट्राने विकासाचा कालखंड अनुभवला. महाराष्ट्राच्या परिवर्तनाला कारणीभूत ठरलेल्या श्वेतक्रांती आणि हरितक्रांती मध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. ते अभ्यासू आणि करारी स्वभावाचे होते. त्यांनी कायमच सत्यासाठी संघर्ष केला. 1985 ते 90 या माझ्या पहिल्या आमदारकीच्या काळात ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी माझा जवळून संबंध आला. सामान्य माणसाचे जीवमान उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

महसूल मंत्री असताना महसूल विभागाला लोकाभिमुख करणारे अनेक निर्णय त्यांनी घेतले. मागास भागाच्या विकासासाठी ते आग्रही होते. विविध खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे.त्यांच्या निधनाममुळे महाराष्ट्राच्या विकासाचा एक शिल्पकार आम्ही गमावला आहे.
 

Social Media