मुंबई : कोविडमुळे यंदा आरोग्य विभागाचे महत्व वाढले होते.यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी वाढीव तरतूद होईल, अशी शक्यता होती. मात्र ती कमी करण्यात आली आहे. कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी अधिक निधीची तरतूद होईल, अशी शक्यता होती. परंतु महापालिकेने या विभागासाठी मागील तरतुदीपेक्षा ५०० कोटी रुपयांनी आकार कमी केला आहे. चालू अर्थसंकल्पात ५,२२६ कोटींची तरतूद आहे. आरोग्य विभागासाठी पुढील अर्थसंकल्पात ४,७२८. ५३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कोविड आपत्तीच्या काळात झालेला खर्च पुढील आर्थिक वर्षात लसीकरणावरही होणार असून प्रत्यक्षात अनेक रुग्णालयीन इमारतींची कामेही सुरु झाली आहेत.
ज्येष्ठ नागरीक, गर्भवती महिला, दिव्यांग यासारख्या व्यक्तींना त्यांच्या घरातच आरोग्य सेवा आणि आरोग्य सल्ला देणे आवश्यक आहे. अशा नागरिकांपर्यंत पोहोचणे हेच आमचे ध्येय असल्याचे सांगत आयुक्त चहल यांनी फिरते दवाखाने साधन सामुग्रीबरोबरच, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यासह सुसज्ज आणि प्राथमिक आरोग्य सेवांच्या आवश्यकतेनुसार परिपूर्ण असतील. त्यामुळे शहर व पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांसाठी ओपीडी ऑन व्हिल्स संकल्पनेनुसार प्रत्येकी एक मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक आवश्यक तपासण्या घरातच करण्यासाठी युनानी, आयुर्वेद यासारख्या इतर औषधोपचार पध्दतीचा वापर करण्यासाठी धोरण राबवण्याबाबत प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी अर्थसंकल्पात ग्वाही दिली आहे. यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोविड लसीकरणाची मोहीम सध्या सुरु असून लस सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार लसीकरण मोहीम राबवून मुंबईतील किमान एक कोटी नागरिकांचे कोविड लसीकरण करण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तसेच संसर्गजन्य रोग असलेल्या क्षयरोग, एड्स, आणि वेक्टर जनित रोग असे मलेरिया, डेग्यू व लेप्टोस्पायरेसिस याकरता सन २०३० पर्यंत सर्व बालकांचे १०० टक्के लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचे आयुक्तांनी स्प्ष्ट केले आहे.
विविध नर्सिंग स्कूलचे रुपांतर कॉलेजमध्ये करण्यासाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच केईएम, शीव व नायरमध्ये सीटी आधुनिक सिटी स्कॅन सुविधे साठी ८ ते १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
केईएम, शीव व नायरमध्ये १५ टेस्ला एमआरआय सुविधे साठी १७ ते २० कोटीची तरतूद
सर्व वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख रुग्णालयांमध्ये नवीन यंत्रसामुगीसाठी ९६ कोटीची तरतूद तसेच रुग्णालये, दवाखाने व आरोग्य केंद्रासह प्रसुतीगृहांच्या संरचनात्मक दुरुस्त्या : साठी ८२२ कोटी रुपये , पुनर्विकास सुरु असलेल्या इमारतींच्या बांधकामांसाठी १२०६ कोटीची तरतूद.