मुंबई : रिपब्लिक टिव्हीचे संपादकअर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा घणाघाती आरोप करत विधानकार्यमंत्री अनिल परब यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावाला स्विकारण्याची मागणी विधानसभाध्यक्षांना केली. दुसऱ्या दिवसाच्या कामकाजात सुरुवातीलाच शिवसेना आमदारांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला. “अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी” अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.“अर्णव गोस्वामी स्वत: न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, स्वत: खटला चालवत आहेत, स्वत: निकाल देत आहेत” अशा शब्दात विधानकार्यमंत्री मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. “डॉ. राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यम ही चौथा स्तंभ आहेत. मात्र अर्णब स्वतःला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात, असा अपमान करणाऱ्या पत्रकाराला शिक्षा झाली पाहिजे. एक घटना घडली तर पत्रकार संरक्षण कायदा आणला, म्हणून त्यांनी काहीही करायचे का?” असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यावेळी भाजपसदस्यांनी गदारोळ केला, घोषणाबाजी आणि गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
पुन्हा कामकाज सुरू झाले त्यावेळी उपाध्यक्षांनी पुरवणी मागण्यांचे कामकाज पुकारले. त्यावर छगन भुजबळ यांनी नेत्यांच ऐकेरी उल्लेख करणा-या गोस्वामीच्या हक्कभंगाबाबत काय झाले असा सवाल केला. त्यावर योग्य ती कार्यवाही करू असा निर्णय दिल्याचे उपाध्यक्षांनी सांगितले मात्र त्याच वेळी भुजबळ यांच्याशी भाजप सदस्यांच्या घोषणा आणि गदारोळामुळे हुज्जत झाली. दोन्ही बाजूचे सदस्य वेलमध्ये आले. त्यामुळे कामकाज पुन्हा अर्धा तासाकरीता तहकूब झाले. त्यानंतर पुन्हा बैठक सुरू झाली त्यावेळी शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी गोस्वामी यांच्या स्टुडोयोत इंटेरियरचे काम करणा-या अन्वय नाईक यांच्या अत्महत्येबाबतचा मुद्दा उपस्थित केला. यावर गृहमंत्री निवेदन करणार होते असे प्रताप सरनाईक म्हणाले. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर देताना सांगितले की, या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल. त्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने अटक करून कारवाईची मागणी केली. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी कंगना राणावत या अभिनेत्रीने केलेल्या वक्त्व्यांबाबतचे निवेदन कधी होणार असा सवाल केला या मुद्यावर काल सदनात २४ तासात गृहमंत्री निवेदन करतील असे सांगण्यात आले होते.
त्याला विरोधीपक्षनेते फडणवीस यांनी आक्षेप घेतला ते म्हणाले की ३ वाजता पुरवणी मागण्यांचा गिलोटीन, चर्चारोध असल्याने त्याबाबतच्या चर्चेत अन्य मुद्दे काढून वेळ घेतला जात आहे. यावेळी कंगना राणावत यांच्या विधानांचा सर्वानी निषेध केला पाहीजे ज्या राज्यात येवून या अभिनेत्रीने नाव आणि पैसा कमाविला त्याबद्दल अवमान कारक बोलणे योग्य नाही असे ते म्हणाले. यावेळी समाजवादी पक्षाचे आबू आझमी यांनी कंगनाला अटक करण्याची मागणी केली. त्यांनी अर्णब गोस्वामी यांने तब्लिगी जमातला विनाकारण दोषी ठरवून हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करन्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेत्यांनी या सर्व विषयामुळे सदस्यांच्या महत्वाच्या अन्य विषयांचा वेळ घेतला जात असल्याचे सांगितले त्यानंतर पुरवणी मागण्यांवरील चर्चाला फडणवीस यांनी सुरूवात केली.