मुंबई : महापालिकेच्या कामांसाठी निविदा सादर करताना वजा १२ टक्के (-१२ टक्के) पेक्षा कमी दराने कंत्राट सादर करणाऱ्या सर्व निविदाकारांना आता ऑनलाईन अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकरणांमध्ये ज्या पात्र निविदाकारास कार्यस्वीकृती पत्र देण्यात येईल, त्यास पत्र दिल्यापासून कार्यालयीन १५ दिवसांच्या मुदतीत डिमांड ड्राफ्ट स्वरुपात ही रक्कम द्यावी लागणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात असलेल्या कंत्राटदारांना या सुधारणेमुळे दिलासा मिळणार आहे. तसेच महापालिका कामांच्या निविदांना अधिकाधिक प्रतिसाद मिळणे शक्य होणार आहे.
महापालिकेत कंत्राटदारांमार्फत विविध कामे करण्यात येतात
असे असले तरी, या सुधारित तरतुदीप्रमाणे, कार्यस्वीकृती मिळाल्यानंतरही अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम न भरल्यास, प्रथम लघूत्तम निविदाकारास २ वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिबंध (डिबार) या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
महापालिकेत कंत्राटदारांमार्फत विविध कामे करण्यात येतात. सध्याच्या पद्धतीनुसार, या कामांसाठी ऑनलाईन ई-निविदा प्रक्रियेमध्ये ज्या-ज्या निविदाकारांनी वजा १२ टक्के (-१२ टक्के) पेक्षा कमी दराने टक्केवारी नमूद केली आहे, अशा सर्व निविदाकारांकडून वजा १२ टक्केपेक्षा जास्त नमूद केलेल्या प्रत्येक टक्क्याला १ टक्के याप्रमाणे, कोणतीही मर्यादा न ठेवता, अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ऑनलाईन स्वीकारली जाते. या प्रचलित तरतुदीमध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे.
निविदा प्रक्रियेअंती ज्या पात्र निविदाकाराचा प्रथम लघूत्तम देकार प्राप्त झाला असेल, त्यास कार्यस्वीकृती पत्र देण्याबाबत प्रशासनाकडून सक्षम प्राधिकाऱयाची मंजुरी घेतली जाते. ही मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित यशस्वी निविदाकारास कार्यस्वीकृती पत्र देण्यात येते. हे पत्र प्रशासनाने दिल्यानंतर, कंत्राट रकमेनुसार, कार्यालयीन कामकाजाच्या १५ दिवसांत, विद्यमान तरतुदीनुसार अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम डिमांड ड्राफ्ट स्वरुपात देणे आवश्यक असेल. महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात हा डिमांड ड्राफ्ट जमा करणे व त्या पावतीची प्रत खातेप्रमुखांकडे सादर करणे हे निविदाकारास आवश्यक असेल. ही अट यापुढे महापालिकेकडून देण्यात येणाऱया कार्यस्वीकृती पत्रात देखील नमूद केलेली असेल.
जर प्रथम लघुत्तम निविदाकाराने कार्यस्वीकृती पत्रात नमूद केल्यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या १५ दिवसांमध्ये अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम जमा केली नाही तर, संबंधित निविदाकाराने भरणा केलेली इसारा अनामत रक्कम संपूर्ण जप्त केली जाईल. तसेच त्या कंपनीला दोन वर्षांसाठी प्रतिबंधित करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्या कंपनीचे संचालक / भागीदार इतर कंपनीमध्ये संचालक / भागीदार म्हणून कार्यरत असतील तर ती कंपनीसुद्धा दोन वर्षांकरिता प्रतिबंधित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेबाबतच्या या बदलामुळे, सर्व निविदाकारांना ऑनलाईन निविदा सादर करताना अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरण्याची आवश्यकता राहणार नाही. तर कंत्राट प्रक्रियेअंती पात्र प्रथम लघुत्तम निविदाकारालाच अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम द्यावी लागेल. कार्यस्वीकृती पत्रात नमूद केल्यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या १५ दिवसांमध्ये अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरण्याची मुदत त्याला देण्यात आली आहे. अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेबाबतच्या या तरतुदीतील सुधारणेमुळे, कोविड – १९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत निविदाकारांना दिलासा प्राप्त होणार आहे.