शरद पवार यांना सलग दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ!


मुंबई, दि. २२ : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सलग दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सोळाव्यांदा पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी राज्यसभा सदनात पार पडला. शरद पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड अशा महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या. आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.


७९ वर्षीय शरद पवार यांनी आतापर्यंत सहा वेळा विधानसभा सदस्य, एकदा विधानपरिषद सदस्य, सात वेळा लोकसभा सदस्य, तर दोनदा राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. लोकशाहीच्या चारही सदनात प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव नेते असावेत. शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात युवा मुख्यमंत्रीही ठरले आहेत. बारामती मतदारसंघातून ते सलग पाच वेळा, तर एकूण सहा वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. तर कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून रिंगणात उतरल्याने पवारांनी २००९च्या निवडणुकीत माढा मतदारसंघातून खासदारकी मिळवली. नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी २०१४ मधील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय पवारांनी २०१२ मध्येच जाहीर केला. त्यानंतर वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेवर ते २०१३मध्ये नियुक्त झाले. “गेली ५३ वर्ष एक दिवसाचाही खंड न पडता लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहांचे सदस्य असणारे पवार हे भारतातील एकमेव व्यक्ती आहेत” असे ट्वीट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.,
भाजपचे राज्यसभा सदस्य म्हणून छत्रपतीचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शपथ पूर्ण होताना जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली मात्र त्यांना उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी असे न करण्याबाबत समज दिली. भागवत कराड – भाजप , रामदास आठवले – भाजप पुरस्कृत, शरद पवार – राष्ट्रवादी, फौजिया खान – राष्ट्रवादी राजीव सातव – काँग्रेस प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना हे अन्य राज्यसभा सदस्य आहेत.

Social Media