साठवलेला कांदा सडू लागला, शेतकरी हवालदिल…

नाशिक : कांदा(onion) व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक(Nashik) जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून गेले काही दिवस बंद पुकारण्यात आला आहे. लिलाव (auction)बंद झाल्यापासून जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कष्टाने पिकवलेल्या उन्हाळ कांद्याचे भाव आज ना उद्या वाढतील, या आशेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला आहे तो आता सडू लागला आहे.

कांदा जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक(Cash crop) आहे. मात्र चार महिने होत आल्याने ऐन विक्री करण्याच्या वेळी कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला, तर दुसरीकडे पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चाळीतील कांद्याला शेतकऱ्यांनी पलटी मारत पुन्हा कांदा चाळींमध्येच साठविला होता. पडणारा पाऊस कांद्याचे होत्याचे नव्हते करत आहे.

वाढलेल्या आर्द्रतेमुळे कांद्याला कोम्ब फुटू लागले आहेत. त्यामुळे चाळीतील कांदा बाहेर काढून कांदे निवडायचे अन् पुन्हा तिथेच भरण्याचे काम शेतकरी कुटुंबाला करावे लागत आहे. रोजंदारीने रोजांदर लावले तर यासाठी मोठी मेहनत अन् मजूरी देखील मोजावी लागते. मात्र या सर्व प्रक्रियेत कांद्याची प्रतवारी घसरून वजन घटत आहे. बाजार समित्या बंद असल्यामुळे कांदा चाळीतच ठेवला तर तो सडू लागला आहे.

सडलेला कांदा उकिरड्यावर फेकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. पावसाची धार सुरू असल्याने कांदा खराब होतो. विक्रीला नेण्यासाठी बाजार समित्या बंद आहे. यामुळे शेतकरी कात्रीत सापडला आहे. आठ दिवसांपासून लिलाव ठप्प असल्याने जिल्ह्यात रोज लाखो क्विंटल कांद्याच्या आवकेतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे यासंदर्भातील बैठका निष्फळ ठरत आहेत.

Social Media