मुंबई : मधुमेह (diabetes)या आजाराबाबत सर्वसामान्य जनतेत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक मधुमेह दिन’ म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत ८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मधुमेह जागरूकता अभियानांतर्गत विविध स्तरांवर एकूण १,३३६ मधुमेह तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन १ लाख नागरिकांच्या मधुमेह तपासणीचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
मधुमेह तपासणी(diabetes screening) शिबिरांना नागरिक व महापालिका कर्मचार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरांदरम्यान ३० वर्षांवरील एकूण १,०८,६८४ व्यक्तींची मधुमेह चाचणी करण्यात आली. चाचणीत मधुमेहाकरिता संशयित (RBS > 140 mg/dl) आढळून आलेल्या व्यक्तींची संख्या ९,२३१ इतकी होती. हे प्रमाण तपासणी करण्यात आलेल्या एकूण व्यक्तींच्या ८ टक्के इतके आहे.
संशयित मधुमेहींचा पाठपुरावा करून रुग्णालय स्तरावर निदान करण्यात आले असून, मधुमेह निदान झालेल्या नवीन रुग्णांची एकूण संख्या २,४१५ इतकी आहे. हे प्रमाण एकूण मधुमेह संशयितांच्या २६% इतके आहे.
निदान झालेल्या रुग्णांना त्यांच्या सोयीच्या महापालिका रुग्णालयात मधुमेहाकरिता नियमित उपचार घेण्याबाबत सूचित करण्यात आले असून सर्व महापालिका दवाखान्यांमध्ये मधुमेह रुग्णांकरिता तपासणी, निदान, उपचार आणि आवश्यकतेनुसार संदर्भसेवा या सुविधा प्रदान करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.