आदित्य ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गृहनिर्माण खात्याचं केलं कौतुक

आदित्य ठाकरे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांच्या खात्याने करुन दाखवलं

मुंबई : बीडीडी चाळीतील 300 रहिवाशांसाठी म्हाडाची लॉटरी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते काढण्यात आली. या लॉटरीबद्दल आदित्य ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गृहनिर्माण खात्याचं कौतुक केलंय

मुंबई बीडीडी चाळीतील 300 रहिवाशांसाठी म्हाडाची लॉटरी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते. बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी काढलेल्या लॉटरीबद्दल आदित्य ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गृहनिर्माण खात्याचं कौतुक केलंय. बीडीडी चाळीबद्दल ऐकत होतो की, विकास होणार. पण महाविकास आघाडी सरकार येईपर्यंत तसं काही झालं नाही. आमचं सरकार आल्यावर हे झालं. जितेंद्र आव्हाड यांच्या गृहनिर्माण खात्याने मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेतल्या आणि हा प्रश्न मार्गी लावल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

सर्व रहिवाशी पात्र ठरण्यासाठी प्रयत्न

1 जानेवारी 2021 पर्यंतचे बीडीडी चाळीतील सर्व रहिवासी पात्र ठरावेत या पद्धतीनं सरकारचं काम चालू आहे. लोकांना खात्री दिली आहे. सरकार एक विश्वासाचं वातावरण निर्माण करु इच्छित आहे. आम्ही घर नंबर दिला आहे. त्या घर नंबरवर संबंधित व्यक्तीच्या नावाने अॅग्रिमेंट होईल. हे अॅग्रिमेंट सरकार आणि संबंधित व्यक्तीच्या नावानं असेल. त्यामुळे अविश्वासाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तसंच साधारण दोन अडीच वर्षात घरं तयार होतील, असा दावाही त्यांनी यावेळी केलाय.

राज्य सरकारवर लोकांचा विश्वास – ठाकरे

विकास प्रकल्पांना कुणाचा विरोध आहे, तो विरोध कशासाठी आहे, हे सर्व बाजूला ठेवून लोकांचा राज्य सरकारवर विश्वास बसला आहे. पुढे फक्त मुंबईत नाही तर हाऊसिंग खातं पूर्ण पॉलिसी बनवत आहे. येत्या काळात चित्र बदलेलं असेल, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केलाय. त्याचबरोबर मुंबईतील महत्वाचे रस्ते अपग्रेड करणार आहोत. या रस्त्यांवरुन फक्त गाड्या नाही तर सायकलिंग आणि चालताही यावं यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईतील अत्यंत महत्वाच्या अशा वरळी आणि नायगाव भागात बीबीडी चाळ आहे. या चाळीत मराठी माणूस राहतो. बीबीडी चाळीतील रहिवाशांसाठी गुरुवारी म्हाडाची लॉर्टरी निघाली आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा मुद्दा गेली अनेक वर्षे गाजत आहे. तुर्तास या बिल्डिंगमधील रहिवाशांना म्हाडाची चांगली घरं उपलब्ध होणार आहेत. भविष्यात मुंबई शहर आणि उपनगरातही म्हाडाची लॉटरी निघेल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे.

Social Media