आहे मनोहर तरी. . . !


मुंबई, दि. 22 : नोव्हे १९ मध्ये सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जीव काही सत्तेत रमत नाही असे त्यांच्या वारंवारच्या वक्तव्यांवरून लक्षात येते. मग सुनिता देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ सारखी या नेत्यांची सत्तेत असून तगमग होत राहते. या गेल्या काही दिवसांपासून राजस्थानात सचिन पायलट यांच्या बंडखोरीच्या बातम्या येत आहेत. पण या बातम्या येण्याआधीपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महाविकास आघाडी सरकारच्या गच्छंतीच्या तारीख पे तारीख अश्या स्वरूपाच्या बातम्या येत राहिल्या आहेत. या बातम्यांमुळे तिघाडी सरकारच्या नेत्यांचे ‘पाय लट लट कापत आहेत’ असे सांगण्यात येते! त्यांना रात्रीची झोपही येत नाही म्हणे! या पार्श्वभुमीवर शेतकरी-साखर उद्योगांच्या समस्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि नंतर कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रामविलास पासवान यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले. मोगलांच्या घोड्यांना म्हणे पाण्यातही धनाजी संताजी दिसत तसे या तिघाडी पक्षांच्या नेत्यांना फडणवीस यांचे काहीतरी राजकीय कारस्थान सुरू आहे असे वाटत राहते. या घडामोडींच्या पाठीमागे भाजपाचे रखडलेल ऑपरेशन लोटस आता येत्या काही दिवसांत राबविले जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. ही शक्यता कोण व्यक्त करत आहेत तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत वारंवार सरकार पाडण्यावरून वक्तव्ये करत राहातात तर आता त्यांची साथ द्याय़ला प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ता सचिन सांवत, महिला आणि बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सरसावले आहेत.

सचिन सावंत यांनी म्हटले आहे की राजस्थानात सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या भाजपने पाचशे कोटी रूपयांची तरतूद केली आहे. तर ऍड. ठाकूर यांनी म्हटले आहे की राज्यातील भाजपचे मोठे नेते कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. अश्याच प्रकारचे जाहीर वक्तव्य या पूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी केले आहे. भाजपचे १८-२० आमदार संपर्कात असल्याच्या या वक्तव्यांचा अर्थ भाजपमध्ये गेलेल्या पूर्वीच्या कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता सत्ता भाजपकडे नसल्याने अस्वस्थता आहे आणि योग्य संधी मिळताच ते घरवापसी करू शकतात. काही प्रमाणात ही बाब खरी देखील आहे. कारण भारतीय जनता पक्षाचा सत्तेचा सारीपाट नोव्हेंबर अखेर शरद पवार यांच्या ‘बारामतीच्या करामती’ने उधळल्यानंतर उध्दव ठाकरे यांचे सरकार सहा महिने सुध्दा चालणार नाही असे भाकीत करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक अग्निपरिक्षा देत गेल्या सहा महिन्यात हे सरकार खुर्चीत बसलेच आहे. त्यातच आता कोरोनाची स्थिती असल्याने किमान पुढच्या दोन महिन्यांपर्यंत तरी भाजपच्या राज्यातील नेत्यांना सरकार पाडण्याची कवायत करता येणार नाही. त्यामुळे आक्टोबर महिन्यात सरकार पाडण्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत असे सांगण्यात येत आहे.

खरे तर शेतकर्‍यांचे विविध प्रश्न आणि साखर उद्योगांसमोर असलेले प्रश्न हा बारामतीच्या काकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. केंद्र सरकारकडून मदतीची मागणी करण्यासाठी ते वारंवार त्यांचे स्वयंघोषित  शिष्योत्तम प्रधानसेवक यांना पत्रे पाठवत राहतात. पण माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची या प्रश्नावर भेट घेतली म्हणे. काय गंमत आहे पहा इतके दिवस शेती आणि सारख उद्योगांचे प्रश्नही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात हे कुणालाच माहिती नव्हते! पण या निमित्ताने देवेंद्रजी यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अमितभाईनी दिले आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रामविलास पासवान यांची भेट घेऊन यासंदर्भातील मागण्यांचे सविस्तर निवेदन त्यांना सादर करण्यात आले म्हणे. महत्वाचे म्हणजे या भेटींच्यावेळी राज्याचे अनेक वर्ष सहकार पणन मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचे सुपूत्र विनय कोरे, धनजंय महाडिक, जयकुमार गोरे, पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, शेतकर्‍यांना एफआरपी मिळायला हवी आणि साखर उद्योग सुद्धा चालला पाहिजे, या उद्देशातून साखर उद्योगातील अडचणी आम्ही अमित शाह यांच्यापुढे मांडल्या. साखर उद्योगांना पॅकेज द्यायला हवे, अशी मागणी केली. एमएसपी, कर्जाचे पुनर्गठन, सॉफ्ट लोन अशा अनेक मागण्या आम्ही केल्या. केंद्र सरकारने अतिशय चांगले इथेनॉल धोरण तयार केले आहे. त्याच्या विस्तारासंदर्भात सुद्धा यावेळी चर्चा केली. शेतकर्‍यांना एफआरपी मिळावी म्हणून एमएसपीत वाढ करण्यासंदर्भातील मागणी केली. केंद्र सरकारकडून साखर उद्योगांसाठी काही चांगले निर्णय लवकरच घेतले जातील, अशी मला पूर्ण आशा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यानी या सा-या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने खरेतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समाधान मानायला हवे कारण जे त्यांनी करायला हवे होते ते सहा महिन्यांपासूनचे त्यांचे मोठे काम राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी करून दाखवले आहे. पण राज्यातील सत्ताधारी नेत्यांना राज्याच्या शेतकरी आणि साखर कारखानदारीच्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर विरोधकांनी केलेल्या कामगिरीचे जराही कौतुक नाही. सध्या राज्याचा आर्थिक गाडा रूतला असताना कारखानदारी सहकाराच्या क्षेत्राला नवी काही दिशा देण्याचा प्रयत्न विरोधक करतात यावर सरकारचा दृष्टिकोन इतका नकारात्मक असावा हे काही योग्य नाही.  

महाविकास नेत्यांची नकारात्मकता
 राष्ट्रवादीचे दिग्गज लढवय्या नेते छगन भुजबळ म्हणतात की, राज्यातील भाजपचे आमदार फुटू नयेत यासाठीच देवेंद्र फडणवीस आणि अन्य वरिष्ठ नेत्यांकडून सत्ता परत येण्याचे लॉलीपॉप दाखवले जात आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. यावर भुजबळ यांनी खोचक टिप्पणी केली. त्यांनी म्हटले की, राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. या काळात भाजपच्या आमदारांनी इकडे-तिकडे बघू नये म्हणून वरिष्ठांकडून त्यांना सत्ता परत येणार, असे लॉलीपॉप दाखवले जात असावे. भुजबळ हे कसलेले राजकीय नेते आहेत. शिवसेनेच्या काळापासून त्यांच्या राजकीय शक्ती आणि युक्तींचा परिचय महाराष्ट्राने घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यात अजिबात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. भाजपमध्ये जाण्याची जी लाट विधानसभा निवडणुकीपूर्वी आली होती त्यात सुमारे चार डझन अन्य पक्षांतील नेते भाजपवासी झाले आहेत. या सर्वाना ‘सत्तेविना करमेना’ झाले होते म्हणून ते तिकडे गेले आणि नंतर पवार साहेबांनी ‘भाजपची सतरंजी ओढून’ घेत उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री केले. त्यामुळे नारायण राणे, विखे पाटील, मोहिते पाटील, पिचड यांच्या सारख्या दिग्गज म्हटल्या जाणा-यांची राजकीय गोची झाली आहे. भाजपमध्ये कॉंग्रेस सारखे वातावरण नसते तेथे आदेश असेल तसे रहावे लागते त्यामुळे या सा-यांची अधिकच घुसमट होत असेलही. ज्येष्ठ नेते भुजबळ यांच्याशी संपर्कात असलेल्या या दिग्गजांनी त्यांना ‘मन की बात’ ही सांगितली असेलही त्यामुळे भुजबळ म्हणतात ते अगदीच असत्य म्हणता येत नाही.पण मग तरीही सत्ताधा-यांना लोटस ची भिती का वाटत राहाते? हा खरा प्रश्न आहे.

दिल्लीत ही भेट घडत असता दरम्यान शिवसेनेच्या सगळ्या खासदारांची बैठक वर्षा बंगल्यावर झाली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांची मत जाणून घेतली. राजकीय प्रादूर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. आमचे सरकार ५ वर्ष टिकेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बैठकीनंतर दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत. त्याच्याशी आमच्या बैठकीचा काहीही संबंध  नाही. राजकीय घडामोडी काहीही सुरू नाहीत. सबकुछ आलबेल है…और आलबेल रहेगा. हे सरकार ५ वर्ष चालेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील, असे संजय राऊत म्हणाले. मग खासदारांची बैठक कश्यासाठी असे विचारणे साहजिकच होते तर कोकणामध्ये गणपती उत्सवाबाबत काय भूमिका घ्यावी, बऱ्याच कालावधीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे म्हणून शिवसेनेचे खासदार एकत्र आले. याशिवाय चर्चेचा मुख्य विषय ‘कोरोनाच्या उपाययोजना’ होता, असेही संजय राऊत यांनी सांगितले. 

तर राज्याच्या  महिला आणि  बाल कल्याण मंत्री-कांग्रेस नेता यशोमती ठाकुर यांनी दावा केला की भाजपच्या 105 आमदारांपैकी काही आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे सार्वजनिकरित्या घेतल्यास राजकीय भूकंप होईल असेही ठाकूर म्हणाल्या..  राजस्थानमध्ये भाजपाकडून सुरू असलेल्या राजकारणावर टीका करताना ठाकूर म्हणाल्या, भाजपाची सत्तेची भूक इतकी वाढली आहे त्यासाठी ते घाणेरडे राजकारण करत आहेत, महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे एकत्र सरकार स्थिर असल्याचे ही ठाकूर म्हणाल्या. ट्विटरवर एक व्हिडीओ संदेश पाठवून ठाकूर यांनी माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आणि म्हणाल्या ते बाहेरून आलेल्या लोकांनी घेरले गेले आहेत, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, भाजपाच्या 105 आमदारांपैकी कितीजण  स्वतःचे भाजपाचे आहेत?  आणि ते नेहमी भाजपा बरोबर राहणार आहेत याचे संशोधन करावे लागेल असेही त्या म्हणाल्या, या आमदारांची  हमी कोणीही घेऊ शकत नाही, पक्षाच्या 105 आमदारांपैकी किती लोक पार्टी सोडण्यास उत्सुक आहेत हे जाहीर केले तर राजकीय भूकंप होईल असेही त्या म्हणाल्या,
भाजप वर टीका करताना पुढे त्या म्हणाल्या कि केंद्रामध्ये भाजपचे सरकार स्थिर असूनही ते राज्यांमध्ये दुसऱ्या पक्षाच्या सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू ठेवत आहेत… त्या म्हणाल्या की सत्ता मिळवण्यासाठी भाजपाचे घाणेरडे राजकारण आधी कर्नाटक मग मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ही सुरूच आहे, त्या म्हणाल्या महाराष्ट्र सरकार स्थिर आहे, या राज्याने देशाला राजकारणाचे नवीन सूत्र दिले आहे, आणि मला वाटते ते सफल होईल…. 

Social Media