केईएममध्ये लवकरच कोरोना लसीची मानवी चाचणी; स्वयंसेवकांना मिळणार 35 लाखांचे विमा संरक्षण

मुंबई : केईएम रुग्णालयात कोरोनावरील मानवी चाचणीला  लवकरच सुरुवात होणार आहे. मानवी चाचणीसाठी पुढाकार घेणाऱ्या स्वयंसेवकांना ३५ लाख रुपये विमासंरक्षण तर समूह विमासंरक्षण म्हणून १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे केईएम रुग्णालयात लवकरच मानवी चाचणीला सुरुवात होणार आहे.  नायर रुग्णालयातील मानवी चाचणीला अद्याप आयसीएमआरने तारीख दिलेली नाही, त्यामुळे नायर रुग्णालयात पुढील आठवड्यापासून मानवी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनावरील लसीची मानवी चाचणीची पुण्यात सुरुवात झाली आहे. दोघा जणांना सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेली ‘कोव्हीशिल्ड’  लस देण्यात आली. त्यामुळे आता केईएम आणि नायर रुग्णालयातही मानवी चाचणीला लवकरच सुरुवात होणार आहे. केईएम रुग्णालयात आतापर्यंत ३५० स्वयंसेवकांची नोंद झाली असून त्यापैकी ज्यांची प्रकृती ठणठणीत असेल त्याच्यावर चाचणी करण्यात येणार असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, नायर रुग्णालयात आतापर्यंत ११० स्वयंसेवकांची नोंद झाली आहे. परंतु आयसी एमआरने अद्याप निश्चित तारीख दिली नसल्याने पुढील आठवड्यापासून मानवी चाचणीला सुरुवात होईल, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ रमेश भारमल यांनी सांगितले.

Social Media