कोरोना स्थितीचा सामना करण्यात राज्यातील सरकार पूर्णपणे अपयशी : भाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा


मुंबई, दि. २७ : कोरोना मुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यात राज्यातील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.राज्य सरकारचे हे अपयश कार्यकर्त्यांनी जनतेपुढे प्रभावीपणे मांडले पाहिजे. या पुढील काळात कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय झाले पाहिजे. भविष्यात राज्यात स्वबळावर सत्तेत आणण्याचा निर्धार करून कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्ढा यांनी केले आहे. ते दूरस्थ चित्रसंवादाच्या माध्यमातून भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या पहिल्याच सभेला मार्गदर्शन करत होते. नड्डा यांनी लॉक डाऊन काळात पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवा कार्याची प्रशंसा केली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिलीच बैठक आज मुंबईत झाली. नड्डा दिल्लीतून बैठकीत सहभागी झाले, तर मुंबईत नसलेले सर्व नेतेही या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहीले. भाजपची राज्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा, उद्धव ठाकरेंनी सरकार पाडून दाखवण्याबाबत दिलेले आव्हान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेली टीका आणि राज्यातील कोरोनाची स्थिती या पार्श्वभूमीवर बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत नव्या कार्यकारीणीत १२ प्रदेश उपाध्यक्ष, १२ महामंत्री (सेक्रेटरी), ६ जनरल सेक्रेटरी आणि १ कोषाध्यक्ष आहेत. कार्यकारिणीचे सदस्य ६९ असतील, तर निमंत्रित सदस्य १३९ जण आहेत. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य आहेत. नागपूरचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महामंत्री आहेत. आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारती महामंत्री आहेत. विजय पुराणिक महामंत्री संघटक आहेत.

राज्यात भारतीय जनता पार्टीची स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले. प्रदेश भाजप कार्यसमिती बैठकीत बोलताना नड्डा यांनी हे आवाहन केले. नड्डा म्हणाले की, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत सक्षमतेने हाताळली.लॉक डाऊन चा निर्णय वेळेत घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. वैद्यकीय सुविधांच्या दृष्टीने अत्यंत प्रगत असलेले अमेरिका व युरोपातील देशांना लॉक डाऊन चा निर्णय वेळेत घेता न आल्याने या देशातील बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.

अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी मोदी सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचा लाभ समाजातील अनेक वर्गांना झाला.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्योग , कृषी या सारख्या विविध क्षेत्रांना या पॅकेजचे फायदे पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याच बरोबर केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती सामान्य माणसापर्यंत प्रभावीपणे पोहचवली पाहिजे, असेही नड्डा यांनी सांगितले.
 

Social Media