कोविड लढ्यास बळ देणाऱ्यांप्रती महापालिका प्रशासनाने व्यक्त केली कृतज्ञता

मुंबई : ‘कोविड १९’ या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध व्हावा आणि बाधित रुग्णांवर अधिकाधिक प्रभावी औषधोपचार व्हावेत, यासाठी महापालिका मार्च २०२० पासून अव्याहतपणे कार्यरत आहे. महापालिकेच्या या अव्याहत प्रयत्नांना अनेक खासगी संस्थांनी वेळोवेळी यथाशक्ती मदत केली आहे. यामध्ये वैद्यकीय यंत्रसामुग्री, विविध साधन सामग्री, पी. पी. इ. किट, निवास व्यवस्था विषयक सुविधा, पौष्टिक खाद्यपदार्थ यासारख्या विविध बाबींचा समावेश आहे. यानुसार महापालिकेच्या कोविड विरोधातील लढ्यास ज्यांची-ज्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत लाभली, त्या सर्वांप्रती महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महापालिका आयुक्त. सुरेश काकाणी यांनी आभार व्यक्त केले आहे. ते आज  जोगेश्वरी पूर्व परिसरात असणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केयर महानगरपालिका रुग्णालय’ येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.

या कार्यक्रमाला विविध दानशूर व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी विशेषत्वाने उपस्थित होते. या प्रतिनिधींमध्ये प्रामुख्याने टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड, अमेरि केअर्स इंडिया फाऊंडेशन, स्वदेश फाऊंडेशन, टाटा सन्स प्रा. लि., रिलायन्स फाऊंडेशन, युनायटेड वे मुंबई, मनी लाईफ फाऊंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, जी. एस. डब्ल्यू स्टील, सेवा सहयोग फाऊंडेशन, केशवसृष्टी, स्मॉल स्टेप्स फाऊंडेशन, सत्कार कॅटरर्स, मदत ट्रस्ट, आरोग्य ज्योत, अपंग संघटना, एल. बी. ट्रस्ट, पेन्टानामी टेक्नॉलॉजी, वर्धमान संस्कारधाम, सेवक ट्रस्ट, भारत विकास परिषद, कार्पोरेट गिफ्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया, अश्नाम स्नॅक्स, अलर्ट सिटीझन, त्रिलोक टेक्नॉलॉजी, आर्दामेहर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांचा प्रामुख्याने समावेश होता.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सर्व संबंधीतांचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोविड विरोधातील लढ्यास ज्यांचा-ज्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लागला आहे, त्या सर्वांप्रती देखील काकाणी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याच कार्यक्रमा दरम्यान महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये व उपचार केंद्रांमध्ये कोविडच्या अनुषंगाने अव्याहतपणे कार्यरत असणारे डॉक्टर्स, नर्सेस, अभियंते, लेखा विभागातील कर्मचारी, कीटक नियंत्रण विभागातील कर्मचारी यांची प्रातिनिधीक स्वरुपात गौरव करण्यात आला. तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केयर महानगरपालिका रुग्णालय’ येथून नुकत्याच निवृत्त झालेल्या डॉ. (श्रीमती) विद्या अरुण माने यांचाही सत्कार या कार्यक्रमा दरम्यान करण्यात आला.

Social Media