चिखलोली धरणाच्या खालच्या बाजूचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा

पर्यटन मंत्री ना.आदित्यजी ठाकरे यांच्या कडे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची लेखी मागणी

मुंबई :  अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्याकरिता पर्यटन विभागाच्या लेखाशिर्ष ३४५२ अंतर्गत मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे राज्याचे पर्यटन मंत्री ना.आदित्यजी ठाकरे यांची गुरुवारी मंत्रालयात भेट घेत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली. यामागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पर्यटन विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ना.आदित्यजी ठाकरे यांनी दिल्या आहेत.

चिखलोली धरणाच्या पायथ्याशी मोकळी जागा असून ही जागा हि अंबरनाथ नगरपरिषदेच्या विकास आराखड्यात दर्शवल्यानुसार ग्रीन झोन मध्ये येत असून नागरीवस्ती पासून बऱ्याच अंतरावर आहे. चिखलोली धरण पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. परंतु, पर्यटनाच्या दृष्टीने कोणतीही सोयी – सुविधा येथे उपलब्ध नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत असते. त्यामुळे या ग्रीन झोनचा योग्यत्या प्रकारे विकास करून विकास आराखड्यास बाधा न आणता पर्यटनाच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात यावी याकरिता पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहेत.

परिसराचे सौंदयीकरण केल्यास पर्यटनात भर पडेल

सद्यस्थितीला जलसंपदा विभागामार्फत चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचे काम प्रगतीपथावर असून धरणाची उंची वाढल्यामुळे तसेच साचलेला गाळ काढल्यामुळे धरणाची साठवणूक क्षमता निश्चीतच वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी पर्यटकांची जास्त प्रमाणात गर्दी होणार आहे. या धरणाच्या परिसराचे सौंदयीकरण केल्यास पर्यटनात भर पडेल तसेच नगरपरिषदेसाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल. त्यासाठी या जागेचे सुशोभिकरण लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, पर्यटन निवासासाठी छोटे खानी गेस्ट हाउस, Musical Fountain विविध प्रकारची झाडे, बोटिंग क्लब इत्यादी बाबींचा समावेश करून या जागेचा विकास करण्यात यावा असे ही आमदार डॉ. किणीकर यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

Social Media