मुंबई : सत्ताधारी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटियाल आणिअकरा आमदार नाराज आहेत. या संदर्भात “आमदारांशी बोलून त्यांचे समाधान करु,” अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ते म्हणाले की “आमच्यासह मित्रपक्षांचेही काही आमदार नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” थोरात म्हणाले की, काही पक्षातील आमदारांना जास्त निधी मिळाला आहे. तर काहींना कमी मिळाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र मी कोणत्याही पक्षाचे नाव घेणार नाही,” असेही बाळासाहेब थोरातांनी सांगितले.
दरम्यान, “राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिले, ही अपेक्षा आहे. काही घटना घडल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यात सुधारणा करु, असे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे त्यामुळे यासंदर्भात आमदारांशी बोलून त्यांचे समाधान करु. आम्ही सर्व नेते मुख्यमंत्र्यांशी बोललो, असे थोरात म्हणाले. ते म्हणाले की,“आमदारांना मतदारसंघ सांभाळायचा आहे म्हणून ते लढत आहेत. आमच्या पक्षातील नाराजी आणि आघाडी सरकारचा काही संबंध नाही. मतदार संघाच्या प्रश्नांसाठी आमदार नाराज आहेत. आमच्यासह मित्रपक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या चर्चा रंगल्या असताना कॉंग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरंट्याल यांची समजूत काढली आहे. याबाबत माध्यमांना माहिती देताना गोरंटियाल यांनी नाराजी दूर झाल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, अजित पवारांचा काल दुपारी फोन आला होता. तुमची नाराजी मी दूर करणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर “दादा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे, असे मी म्हणालो. उपोषणही मी मागे घेतले. बाकीच्या आमदारांचीही नाराजी नाही. अजितदादांनी स्वतः गॅरंटी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सध्या भेट नाही, मात्र अधिवेशनात मुख्यमंत्री भेटतील” असेही गोरंट्याल यांनी सांगितले. “जितना चाहा उतनी मोहब्बत नहीं मिली | मुनाफे का छोड़ीए, लागत भी नहीं मिली, कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया, हमें शहीद होकर भी शौहरत ना मिली” अशी शायरी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी माध्यमांना ऐकवली.
ते म्हणाले की, नगरपालिकांच्या विकासकामांचा निधी पीडब्लूडीला (सार्वजनिक बांधकाम विभाग) देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजितदादांनी शब्द दिला, त्यानंतर माझी नाराजी दूर झाली आहे” अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी दिली.