जालना : जालन्यात आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मेघना बोर्डीकर आणि भागवतराव कराड हे नेते देखील उपस्थित आहेत. मात्र, पंकजा आणि प्रतिम मुंडे भगिनींसह समर्थक नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या मराठवाड्यात पक्षबांधणीसाठी दौरे करत आहेत. मात्र मराठवाड्यात राजकीय शक्ति असणा-या मुंडे भगिनीना या दौ-यात स्थान नसल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जवळपास वर्षभराने पंकजा यांना राष्ट्रीय सचिवपद देवून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले तरी ते केवळ औपचारीक असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय सचिव म्हणून पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमात पंकजा यांना सोबत न घेताच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एकटेच फिरत असल्याने मुंडे यांचे पंख छाटण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे.
मात्र त्यांच्या गैरहजेरीबाबत खुलासा करताना, आमदार मेघना बोर्डीकर यांनी पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त फेटाळून लावले. पंकजाताई त्यांचे महत्वाचे काम आल्यामुळे दिल्लीत गेल्या आहेत. त्यामुळे त्या आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नसल्याचे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले. तर भाजप नेते भागवतराव कराड यांनीही पंकजा मुंडे नाराज नसल्याचे स्पष्ट केले. पंकजा मुंडे यांची वैयक्तिक कारणाने बैठकीला आल्या नाहीत. कुठलीही नाराजी नाही. बाकी मला याबाबत काहीही माहिती नाही असे ते म्हणाले.
प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांना पक्षात अजूनही डावलले जात असल्यामुळे मराठवाड्यातील पक्षबांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना त्या उपस्थित राहत नसल्याचा दावा भाजप नेत्यांकडून फेटाळला आहे. पंकजा मुंडे वैयक्तिक कारणांमुळे या बैठकांना उपस्थित राहिल्या नाहीत, अशी सारवासारव भाजपच्या नेत्यांकडून सोमवारी करण्यात आली. मात्र, त्याचवेळी औरंगाबादमधील बैठकीला पंकजा मुंडे समर्थकांनी दांडी मारल्याने भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे.