जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांची भामरागड पूरग्रस्तांना भेट; वडसा व सावंगी येथील पूरस्थितीचीही केली पाहणी

गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भामरागड तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यात पुरामुळे अनेक घरांचे, शेतीचे तसेच भामरागड शहरातील व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. याबाबत पालकमंत्र्यांनी भामरागड या ठिकाणी जाऊन त्याबाबत पाहणी केली. भामरागड तहसील कार्यालयात पुरामुळे बाधित झालेल्या 120 गावांमधील 100 हून अधिक लोकांना त्यांच्या हस्ते ब्लॅंकेट व जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी त्यांनी पूरस्थिती बाबत पूरग्रस्तांशी संवाद साधला व आवश्यक मदतीबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. यामध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे, घरांचे व इतर ठिकाणचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. यावेळी त्यांनी भामरागड तालुक्यातील सर्व 8400 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य कीट व प्रत्येकाला एकेक ब्लॅंकेट मदत म्हणून दिले. याबाबत उर्वरित साहित्य वाटप प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. आज उपस्थित 100 हून आधिक कुटुंबांना साहित्य वाटप करण्यात आले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या दुःखद निधनामुळे आयोजित कार्यक्रमांमध्ये सत्कार न स्वीकारता त्यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पर्लकोटा नदीवरील पूलाला भेट देऊन पाहणी केली व त्या ठिकाणी नव्याने पूल होणार आहे त्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी त्यांनी भामरागड मधील दरवेळेस पुराच्या पाण्यात जाणाऱ्या घरांना व व्यापारी वर्गाला नवीन ठिकाणी पुनर्वसनासाठी आवश्यक मदत जिल्हा नियोजन मधून नगर विकास खात्यांतर्गत देण्यासाठी तातडीने प्रयत्न करू असे सांगितले.

यानंतर त्यांनी देसाईगंज वडसा येथील पूरग्रस्तांना व सावंगी येथील बाधितांना भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली.आणि तेथील नागरिकांना सुद्धा जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.
सावंगी येथील तसेच देसाईगंज शहराजवळील पुरामुळे झालेल्या नुकसानाचेही पंचनामे करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी भामरागड पूरस्थिती बाबत सादरीकरणाद्वारे पालकमंत्र्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, सहाय्यक जिल्हाधिकारी मनोज जिंदल, तहसीलदार सत्यनारायण सिलमवार उपस्थित होते.

Social Media