डेटिंग साईटद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून १६ जणांना लुबाडणाऱ्या तरुणीला अटक

चिंचवड(पुणे) : बंबल, टिंडर या डेटिंग साईटद्वारे युवकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना भेटण्यासाठी बोलावून गुंगीचे औषध देऊन लुबाडणारी तरुणी गुन्हे शाखा युनिट चारच्या जाळ्यात अडकली आहे. या तरुणीने तब्बल १६ युवकांना डेटिंग साईटवरून मैत्री करून लुबाडले आहे. मात्र, केवळ चार जणांनी फिर्याद दिली आहे. हे चारही गुन्हे उघडकीस आले आहेत. सायली देवेंद्र काळे (वय २७, रा. साधू वासवानी रोड, पुणे) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीने १० डिसेंबर २०२० रोजी रावेत येथील एका युवकासोबत त्याच्या घरी येऊन त्याच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला.याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस करीत होते. पोलिसांनी तिचाच फंडा वापरून तिला पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस हवालदार प्रवीण दळे, पोलीस नाईक तुषार शेटे, गौस नदाफ आणि पोलीस शिपाई प्रशांत सैद यांनी फिर्यादी तरुणाशी संपर्क करून आरोपी तरुणीची माहिती काढली.

चेन्नई येथील तरुणाची आणि आरोपी तरुणीची बंबल या डेटिंग ॲपवरून मैत्री झाली असल्याने पोलिसांनी बनावट प्रोफाइल तयार केले. बंबल या डेटिंग ॲपमध्ये शोध सुरु केला. अखेर तिची प्रोफाइल सापडली आणि पोलिसांनी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. बरेच दिवस तरुणीने पोलिसांच्या बनावट प्रोफाइलला प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, आरोपी तरुणीने चेन्नई येथील एका तरुणाला डेटिंग साईटच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला पुण्यात भेटायला बोलावले. वाकड येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ते दोघेही राहिले. दरम्यान तरुणीने तरुणाला आग्रहाने सॉफ्टड्रिंक पाजले. त्यातून तिने तरुणाला गुंगीचे औषध दिले.

सॉफ्टड्रिंक प्यायल्यानंतर तरुणाला गुंगी आली आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण एक लाख ५० हजारांचा मुद्देमाल घेऊन हॉटेलमधून पळ काढला.
याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. देहूरोड आणि वाकड येथे झालेल्या दोन्ही गुन्ह्यांची पद्धत एकच असल्याने हे प्रकरण उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी गुन्हे शाखा युनिट चारकडे सोपवले.

इतरांना जाळ्यात ओढण्याच्या पॅटर्नमध्ये ती स्वत:च अडकली

देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना ज्या तरुणीच्या प्रोफाइलवर पोलिसांच्या बनावट अकाउंटवरून रिक्वेस्ट पाठवल्या होत्या, त्यातील एका प्रोफाइलची रिक्वेस्ट तरुणीने स्वीकारली. त्यातून पोलिसांनी तिच्याशी संवाद वाढवून तिला भूमकर चौक येथे तिच्या वेळेनुसार भेटायला बोलावले.२६ जानेवारी रोजी तरुणी वाकड येथे आली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तीच आरोपी तरुणी असल्याचे निष्पन्न झाले. तिला अटक करून वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही तरुणी मूळ पुण्यात राहत नसलेल्या युवकांना शोधून त्यांच्याशी संपर्क साधायची. त्यांना बाहेर भेटायला बोलावत. त्यानंतर त्यांना लॉजवर अथवा घरी नेण्यास सांगून त्यांच्या पेयांमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून बेशुद्ध करायची. संबंधित तरुण बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन चोरून न्यायची.

या तरुणीने एक वर्षाच्या कालावधीत तब्बल १६ युवकांना अशा पद्धतीने फसवले आहे. पोलिसांनी तिच्याकडून १५ लाख २५ हजार रुपयांचे २८९ ग्रॅम सोन्याचे दागिने व मोबाईल फोन जप्त केले आहेत. तरुणांना गंडवून चोरलेले सोन्याचे दागिने ही तरुणी पुण्यातील सराफांकडे वेगवेगळी भावनिक कारणे सांगून गहाण ठेवायची.

रास्ता पेठ येथील एका सराफाला तिने सांगितले की, तिचे वडील सेवानिवृत्त कर्नल आहेत. त्यांना कॅन्सरचे निदान झाले आहे. सध्या त्यांच्यावर रुबी हॉल येथे उपचार सुरु आहेत. तिला पैशांची तीव्र गरज आहे.’ असे सांगून चोरलेले सोने सराफाकडे गहाण ठेऊन पैसे घेतले होते.

गुंगीचे औषधे (Numb drugs)तिच्या आईचीच….

आरोपी तरुणी तरुणांच्या पेयांमध्ये जे गुंगीचे औषध टाकत होती ते औषध तिच्या आईचे होते. तिच्या आईला विस्मृतीचा आजार होता. त्यामुळे डॉक्टरांनी तरुणीच्या आईला गुंगीचे औषधे दिली होती. ती औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी करून तरुणांच्या पेयांमध्ये टाकण्यासाठी ही तरुणी वापरत होती. लुबाडल्या पैशांमधून ती कपडे आणि चैनीच्या वस्तू खरेदी करत असे. तसेच हे पैसे ती नशा करण्यासाठी आणि पार्ट्यांसाठी देखील वापरत होती.

ती एका ठिकाणी नोकरी करत असल्याचे तिने घरी सांगितले होते. प्रत्येक महिन्यात ती घरी ठराविक रक्कम देखील देत होती. मात्र, नोकरीच्या नावाखाली तिने हा फसवणूक करून लुबाडण्याचा गोरखधंदा चालवला होता, हे तिच्या घरच्यांना पोलीस कारवाईसाठी घरी गेल्यानंतर माहिती झाले.

या ‘बंबल बी’च्या जाळ्यात अडकलेले अनेक तरुण फिर्याद देण्यासाठी पुढे येत नसत. समाजात आपली बदनामी होईल या करणापोटी ते पोलिसात येण्याचे टाळत तसेच ही तरुणी फिर्याद देणा-यावरच उलटे आरोप करेल अशी भीती देखील अनेकांना वाटत होती. दरम्यान वाकड, देहूरोड आणि चंदननगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून ते गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही तरुणी केवळ तरुणांनाच नव्हे तर महिलांना देखील आपल्या जाळ्यात ओढायची. फेक प्रोफाइल द्वारे महिलांशी संपर्क करून त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचे देखील प्रकार तपासात समोर आले आहेत. दोन महिलांसोबत तिने ब्लॅकमेलिंग केल्याची प्रकरणे उघड झाली आहेत. आणखी काही महिलांसोबत तिने अशा प्रकारची फसवणूक केले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

चोरलेल्या फोनचे काय करायची ?

ही तरुणी बंबल व टिंडर(Bumble and Tinder) ॲपवरून तरुणांशी संपर्क करून त्यांच्याशी कधीही रेग्युलर कॉलवर बोलत नसे. फक्त संबंधित ॲपवर चॅटिंग आणि व्हाट्सअपवर कॉल करत असे. ज्यामुळे पोलिसांनी रेग्युलर कॉलिंग तपासल्यास पोलिसांच्या हाती काहीही लागू नये, असा तिचा उद्देश होता.

तसेच जाळ्यात अडकलेल्या तरुणांचे दागिने, पैसे आणि फोन चोरून न्यायची. चोरलेला फोन स्वतः वापरत नसे. तसेच त्याची कुणाला विक्री सुद्धा करत नसे. तर चोरलेल्या फोनमधून प्रथम ती संबंधित डेटिंग ॲप अनइन्स्टॉल करायची. त्यानंतर फोन फोडून तो कच-यात फेकून द्यायची. यामुळे डेटिंग ॲपचा तरुणीच्या विरोधातील कुठलाही पुरावा पोलिसांना सापडत नव्हता.

Tag-A young woman has been arrested for luring 16 people into a love trap through a dating site/Bumble and Tinder

Social Media