‘त्या’ पत्रात सहभागी महाराष्ट्रातल्या 3 काँग्रेस नेत्यांच्या राजकीय वाटचालीवर परिणाम होणार?

 

मुंबई : कधी हायकमांडचे लाडके असलेले पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा या तीन नेत्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर गेल्या दोन तीन दिवसांत झालेल्या पत्र प्रकरणाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे?  पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ३ नेत्यांचाही समावेश होता. या पत्रातून संघटनेच्या हिताचेच मुद्दे उपस्थित झाले असले तरी त्याच्या वेळेबद्दल काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित झाले. या पत्राचा परिणाम या नेत्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काँग्रेस कार्यकारीणीची काल 7 तास वादळी बैठक झाली ज्या २३ नेत्यांनी पत्रावर स्वाक्षरी केल्या त्याबद्दल सोनिया गांधींनी भावना व्यक्त केली. सहा महिन्यांत नव्या अध्यक्षाची निवड करायची तोपर्यंत सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष राहणार हेही यावेळी स्पष्ट झाले असले तरी ज्या नेत्यांनी हे पत्र लिहिले त्यात महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा या तीन नेत्यांच्या राजकीय वाटचालीवर पत्र प्रकरणाचा काय परिणाम होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरां यांचे वेगळे सूर जाणवत आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक यांचे हायकमांडशी अगदी उत्तम संबंध राहिले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाशी जुळवून घेणे त्यांना जड जात असल्याने त्याची घुसमट पत्रातून व्यक्त झाली असावी असे सांगितले जात आहे.

याचे कारण पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लढवून केंद्रात पुनर्वसन न करता विधानसभा लढवण्यास सांगण्यात आले मात्र. नंतर ना ते मंत्री झाले, ना विधानसभा अध्यक्ष. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीला ना राष्ट्रीय ना राज्य पातळीवर काही दिशा राहिली त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांना काही जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा असतानाच त्यांचे पत्र प्रकरण समोर आल्याने भविष्यात राहुल गांधी त्यांना विश्वासात घेतील का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

तीच गोष्ट मुकुल वासनिक यांची, सोनिया गांधी यांच्या अत्यंत महत्वाच्या शिलेदारांत असल्याने त्यांना संघटनेत महत्वाची जबाबदारी देण्यात आली पण सध्या राहुल यांचे खास के सी वेणुगोपाल यांच्याकडेच संघटनेचा भार सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यसभा उमेदवारीच्या वेळी वासनिक यांच्या ऐवजी त्यांचे नाव चर्चेत आले. मात्र शेवटच्या क्षणी राहुल गांधी गटातल्या राजीव सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने मुकुल वासनिक यांचे संघटनेतील भविष्य काय हा प्रश्न आहे.

लोकसभा निवडणूक जिंकणार असे सांगत पराभव झालेल्या मिलिंद देवरा यांच्याबाबतीत तर अनेक चर्चा सुरु आहेत. ज्योतिरादित्य, सचिन पायलट यांच्यांनतर भाजपच्या बाजूला आणखी कोण कोण जाऊ शकते याची यादी देताना. काही लोक मिलिंद देवरा यांचेही नाव घेतात. याचे कारण मिलिंद देवरा यांची अंबानी समूहातील दोस्ती आणि त्यांनी गेल्या काही दिवसांत मते मांडताना भाजपकडे झुकलेला कल दिसून आला आहे. त्यात पत्र प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीवर काय परिणाम होणार यांची चर्चा आता सुरू झाली आहे. या तीनही नेत्यानी माफी मागावी अन्यथा त्यांना फिरू देणार  नाही असा इशारा नुकताच पक्षातून देण्यात आला आहे. हे राजकारण आता कोणत्या वळणाला जाते ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Social Media