मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सरकारी टाळेबंदीतून बचाव करत लोकल बंद असल्याने पायपीट करत किंवा खाजगी वाहतूकीला लोंबकळत कामाचे ठिकाण गाठणा-या मुंबईकरांना आज पावसाने गाठले आणि इतका बरसला की सखल भागात पूरस्थिती होवून पावसाच्या टाळेबंदीमुळे मुंबईत जनजीवन ठप्प झाले.
काल सायंकाळपासूनच मुंबईत, नवी मुंबईसह पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सुरु झालेल्या पावसाचा जोर बुधवारी सकाळीसुद्धा कायम असल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचलं आणि रस्तेही जलमय झाले. दक्षिण मुंबईतील बहुतांश भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक अडचणी उदभवल्या असून, मुंबईकरांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. दुकानांपासून अनेकांच्या घरांमध्येही पावसाचे पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. वडाळा, माझगाव डॉक, भायखळा, दादर, हिंदमाता हे सारे भाग जलमय झाले आहेत. अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळे अत्यावश्यक सेवांसाठी सुरु असणारी रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे.
कुर्ला, सायन, दादर या रेल्वे मार्गांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर याचे थेट परिणाम झाले आहेत. पश्चिम रेल्वेवर पावसामुळे फारसा खोळंबा झालेला नसला तरीही मध्य रेल्वेची वाहतूक या मुसळधार पावसामुळे कोलमडले आहे. गोरेगाव, अंधेरी सबवे याशिवाय अनेक भागांमध्ये पणी साचल्यामुळे बहुतांश मार्गांवरी रस्ते वाहतुकही वळवण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. पावसाचा कहर झाल्याने मुंबईत सरकारी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. तर घराबाहेर पडलेल्यांचे रस्ते मार्गाने प्रवास करताना वाहतूक कोंडीने हाल झाले. ऐरवी असणारी कोंडी आज पाणी साचल्याने अधिक जाणवत होती.