मालमत्ता करविषयक देयके उपलब्ध होणार इ-मेलवर करदात्यांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर केवायसी भरावी

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे मालमत्ता करविषयक देयके करदात्यांच्या नोंदणीकृत इ-मेलवर पाठविण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येत असून त्यासाठी करदात्यांनी महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी (KYC) फॉर्ममध्ये आपली आवश्यक ती माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

महापालिकेतर्फे मालमत्ता करदात्यांना जाहीर आवाहन करण्यात आले की, महापालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी (KYC) फॉर्ममध्ये आपली आवश्यक ती माहिती अद्ययावत करावी. जेणेकरुन मालमत्ता कराविषयी सूचना ही ई-मेल आणि लघुसंदेश अर्थात एसएमएस द्वारे अवगत करण्यात येईल. तसेच मालमत्ता कराचे देयकसुद्धा करदात्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सुविधेसाठी केवायसी माहिती देणे अनिवार्य आहे.

या सुविधेमुळे महापालिका प्रशासनासह करदात्यांनाही मोठा फायदा होणार आहे. कारण त्यांना मालमत्‍ता कर देयके वेळेत प्राप्‍त होतील. यामुळे वेळेवर करभरणा होऊन दंडाची कारवाई टाळता येईल. सोबतच महापालिकेच्‍या विविध योजनांची माहिती नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघूसंदेश (एसएमएस) द्वारे व नोंदणीकृत ई-मेलद्वारे मिळेल. भविष्‍यातील मालमत्‍ता कराविषयक योजनेची माहिती वेळेत मिळेल. त्याचप्रमाणे करदात्यांच्या मालमत्तेत झालेल्‍या दुरुस्‍तीमुळे सुधारित देयके त्‍वरित उपलब्‍ध होतील. महापालिकेच्‍या देयकांसाठी वापरात असलेल्‍या कागदाचा व त्‍यावरील पोस्टेज, पाकिटे, फ्रॅकिंग या बाबींचा खर्च टाळता येईल. वेळ व पैसा या दोन्हींबाबत करदात्यांसह महापालिकेचीही बचत होणार आहे.

 

Social Media