युवासेनेच्या हट्टासाठी राज्य सरकार परिक्षांबाबत एकतर्फी निर्णय घेत होते : देवेंद्र फडणवीस यांचे टिकास्त्र

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन युवासेनेवर निशाणा साधला, तर सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांकडे पुन्हा एकदा बोट दाखवले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत युवासेना आणि महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

देशभरातील कुलगुरुंचे हेच मत होते. इतकेच काय महाराष्ट्रातील कुलगुरुंच्या समितीचेही हेच मत होते. मात्र युवासेनेच्या हट्टासाठी राज्य सरकार त्याबाबत एकतर्फी निर्णय घेत होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा विद्यार्थ्यांवर परिणाम झाला असता. भविष्यात त्यांची पदवी बिनकामी ठरली असती. मात्र न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत, त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या पदवीला किंमत राहील, असे फडणवीस म्हणाले. भाजपच्या कोणत्याही नेत्याने आदित्य ठाकरे यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नाव घेतले नाही. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सध्या ज्या घटना समोर येत आहेत, त्या सीबीआय येईपर्यंत मुंबई पोलिसांना का सापडल्या नाहीत? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? ४० दिवसात पुरावे नष्ट झाले असतील. हार्ड डिस्क नष्ट केल्याचे वृत्त माध्यमात पाहिले. मग पोलिसांवर राजकीय दबाव होता, की काही अडचण होती, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यात देशापेक्षा मृत्यूदर जास्त आहे. देशातील ४० टक्के मृत्यू राज्यात झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अद्याप चिंताजनक स्थिती आहे. कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या करण्याची गरज आहे. पुण्यात समाधानकारक स्थिती आहे पण मुंबईत नाही, असेही ते म्हणाले.

Social Media