मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेतील दातृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी पार पडलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रमांसाठी अधिकाधिक निधी संकलन करणा-या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था तसेच कॉर्पोरेट प्रतिनिधी यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावर्षी २९५ अशासकीय सामाजिक संस्थांनी मॅरेथॉनच्या माध्यमातून विविध समाज कार्यांसाठी आजवरचा सर्वाधिक ४५.९० कोटी रुपयांचा निधी उभारला.
यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी ५५००० स्पर्धक सहभागी असलेल्या या मॅरेथॉनला झेंडी दाखवून रवाना करण्याचा आपणाला बहुमान मिळाला. मॅरेथॉनमध्ये देशाच्या विभिन्न भागांतून तसेच विदेशातून स्पर्धक सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने स्पर्धक भाग घेत असलेली ही स्पर्धा आज ख-या अर्थाने राष्ट्रीय मॅरेथॉन झाली आहे. मॅरेथॉनच्या माध्यमातून समाज कार्यांसाठी निधी संकलित करणारे दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी संस्था देशातील करोना संसर्गाच्या निवारण कार्याला देखील हातभार लावतील अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.
श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर या संस्थेसाठी सन २००४ पासून सातत्याने सर्वाधिक निधी संकलन करणारे, परंतु गेल्या वर्षी अपघातामध्ये निधन झालेले दिवंगत धवल मेहता यांना यावेळी मरणोपरांत सन्मानित करण्यात आले. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते दिवंगत धवल मेहता यांच्या पत्नी अनुजा मेहता यांनी हा सन्मान स्विकारला.
महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेडचे ग्रुप सीएफओचे व्ही.एस.पार्थसारथी यांनी केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट प्रकल्प ‘नन्ही कली’ करिता २.२५ कोटी रुपये उभारले. एनआयआयएफ इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव राव यांनी ईशा फाउंडेशनसाठी, कोटक महिंद्रा बँकेचे संचालक के व्ही एस मणियन यांनी कर्करोग रुग्ण मदत संस्थेसाठी, तर लाईट ऑफ लाईफ ट्रस्टसाठी व्यवस्थापकीय संचालक विली डॉक्टर यांनी प्रत्येकी एक कोटीपेक्षा अधिक निधी संकलन केले. या सर्वांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यंदा सर्वात जास्त म्हणजे ७.५० कोटी निधी श्रीमद राजचंद्र मिशन या संस्थेने जमा केला. संस्थेच्या वतीने श्रीमती बीजल मेहता यांनी राज्यपालांकडून सन्मान स्विकारला.
‘युनायटेड वे मुंबई’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयंती शुक्ला यांनी सांगितले की, जानेवारी २०२० मध्ये झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या व्यासपीठाचा वापर करून २९५ स्वयंसेवी संस्थांनी ४५.९० कोटी रुपयांचा निधी जमा केला.मॅरेथॉनचे आयोजक असलेल्या प्रोकॅम इंटरनेशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंग, प्रोकॅमचे सहव्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग आणि टाटा समूहाचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट्ट यावेळी उपस्थित होते.