मुंबई : सबका साथ सबका विकास सबका विश्वास म्हणत अयोध्येतील राम मदिरासाठीची न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत, असे कौतुक हिंदुत्वाचा पुरस्कार केलेल्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे यांनी पत्र लिहून भावना व्यक्त केल्या.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, नऊ दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गती मिळेल. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचे अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे. अर्थातच या क्षणी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.