श्र्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल 

मुंबई : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे आणि अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. मनोरंजन क्षेत्रात देखील कोरोनाचा शिरकाव झालेला असून अनेकजण बाधित झाले आहेत.   महानायक अमिताभ बच्चन आणि  त्यांच्या कुटुंबातील  अन्य सदस्य नुकतेच करोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत.

बॉलीवूडमध्ये करोनाची दहशत पसरली असतानाच अभिनेता संजय दत्तला आज श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. संजय दत्तची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सध्या चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात  येत आहे.

संजय दत्तची ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होत असल्याने तसेच श्वास घेण्यास काहीसा त्रास होत असल्याने त्याला आज सायंकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला सध्या नॉन-कोविड आयसीयू वॉर्डात ठेवण्यात आले असून रुग्णालयात दाखल होताच त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर संजय दत्तचा स्वॅब घेऊन तो करोना चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Social Media