सत्ताधारी पक्षाचाच विरोधी पक्षनेता ? : मुंबई महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक व्हावी ह्यासाठी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. ह्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पालिकेला हा सवाल केला आहे.

२०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता तर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. परंतु त्यावेळी राज्यात भाजप – शिवसेना युती असल्याने भाजप ने विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले नव्हते. त्यामुळे हे पद तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या काँग्रेस कडे गेले होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेने भाजप ची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर महविकास आघाडी चे सरकार राज्यात स्थापन केले. तरीही महापालिकेचे चे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस कडेच राहिले. भाजप चे शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा ह्यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये महापौरांना पत्र लिहून भाजप चे गटनेते प्रभाकर शिंदे ह्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावे अशी मागणी केली होती. परंतु महापौरांनी तसे केले नाही.

प्रभाकर शिंदे ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली परंतु तेथे त्यांच्याविरोधात निकाल लागला. ह्याच निकालाला आव्हान देत त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सत्ताधारी आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षचाच विरोधी पक्षनेता कसा, असा प्रश्न ह्यावेळी कोर्टाला पडला. कोर्टाने आता ह्या प्रकरणावर महापालिकेकडे कडे उत्तर मागितले आहे.

Social Media