सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि भाजपात राजकारण रंगले! : तपास केंद्राकडे देण्यास युवा नेत्याचा दबाव भाजपचा आरोप!!


मुंबई, दि. ३१ जुलै : महिनाभरापासून सुरू असलेल्या अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या संशयीत मृत्यू प्रकरणावरून सुरू असलेल्या चर्चेत आता राज्यातील राजकीय नेत्यांनी उड्या घेतल्या आहेत! या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी व्टिटद्वारे आणि नंतर माध्यमांसमोर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली आहे. फडणवीस यांनी या प्रकरणात  कथित हवाला व्यवहार झाले असल्याच्या कारणाने हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणा आणि सक्त वसुली संचलनालयाकडे देण्याची मागणी केली आहे.  

ते म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी अनेकांची मागणी आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या वागणुकीकडे बघितल्यावर तसे होणार नाही. पण याप्रकरणी ईडीने तरी ईसीआयआर दाखल करुन मनी लॉन्ड्रिंग आणि मनी ट्रेलिंगबाबत चौकशी करावी”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, बिहार पोलिसांच्या पथकामार्फत मुंबईत सुरु असलेल्या चौकशीवरुन पाटण्यातील बिहार पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात उच्चस्तरीय बैठक झाली. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलीस बिहार पोलिसांच्या पथकाला सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे.

“बिहार पोलिसांच्या तपासात मुंबई पोलीस अडथळा आणत आहेत. बिहार पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. मात्र, मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळताना दिसत नाही. त्यामुळे सीबीआयने याप्रकरणाची दखल घ्यावी, असे भाजपला वाटते”, असे सुशील कुमार मोदी म्हणाले आहेत. दरम्यान माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील यावर भाष्य करताना सुशांत सिंह यांच्या आत्महत्येनंतर त्याना दुर्दैवाने जास्त प्रसिद्धी मिळतेय, अशी खंत व्यक्त केली. तसेच सुशांत चांगला, दर्जेदार कलाकार होता, त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीचे नुकसान झाले आहे, असे सांगतानाच पाटील म्हणाले. की, हा विषय पोलिसांच्या सरळ चौकशीवर मर्यादीत ठेवावा. त्याचा चिघळून चोथा करण्यात अर्थ नाही. त्याने आत्महत्या केलीय, जो चौकशी अधिकारी आहे त्यांने वस्तुस्थिती समोर आणावी आणि याला पूर्णविराम द्यावा, असेही ते यावेळी म्हणाले. आपल्यातून गेलेल्या व्यक्तीच्या खाजगी जीवनाबद्दल जास्त चर्चा होणे योग्य नाही. त्यामुळे चर्चा न करता हा विषय इथेच थांबवला पाहिजे. बिहारच्या पोलीसांना जी माहिती हवी ती मुंबई पोलिस देतील, असे ही ते यावेळी म्हणाले. 

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप भाजपचे आमदार आणि प्रवक्ते अतुल भातकळकर यांनी केला आहे. सीबीआयने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली आहे, असे भातखळकर म्हणाले. अतुल भातकळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिले आहे. तसेच माझा रोख कुणाकडे आहे, हे उघड गुपित असल्याचेही भातकळकर म्हणाले आहेत.  सुशांतसिंग प्रकरणाची चौकशी सीबीआयला द्यावी, अशी मागणी फक्त भाजपच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी केली होती. यासाठी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेटही घेतली. पण मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत असल्याचे सांगत गृहमंत्र्यांनी ही मागणी नुकतीच फेटाळली. दरम्यान सायंकाऴी अभिनेता शेखर सुमन यांनी राजभवनावर जावून राज्यपालांना हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची विनंती केली आहे.  

Social Media