सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका; भाजप नेत्यांच्या उत्साही प्रतिक्रिया!

मुंबई  : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणीचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणीचा तपास हा सीबीआयकडे सोपवला. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकारला हा दणका मिळाल्याची भूमिका विरोधी पक्षाकडून मांडण्यात येत आहे. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे न्यायालयाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळताना न्यायालयाने हा आदेश दिला. पाटण्यात दाखल गुन्हा मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे.

राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
या मुद्यावर राज्यात गेले काही दिवस राजकीय राजकारण ढवळून निघाले असल्याने राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षीत होत्या त्यानुसार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे” असे मत व्यक्त केले. तर माजी मंत्री ऍड आशिष शेलार म्हणाले की, आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का? तर  “महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस आयुक्तांनी दोन महिने गुन्हाच नोंदवून न घेणे दुर्दैवी आहे. सुशांतसिंह च्या परिवाराला न्याय मिळेल आणि ठाकरे सरकारची दादागिरी संपेल” असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, “सर्वसामान्य जनतेच्या मनात सुशांतसिंह प्रकरणासंदर्भात शंका कुशंका होत्या आणि त्यामुळेच सीबीआय चौकशीची अपेक्षा होती ती सन्माननीय न्यायालयाने मान्यता केली. त्यामुळे दूध का दूध पानी का पानी हे या प्रकरणात होईल आणि जे जनतेला अपेक्षित आहे तेच होईल. भाजप आमदार राम कदम यांनी निकालाच्या आधीच महाराष्ट्र सरकारला करारा झटका मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान ही चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देखील  सत्यमेव जयते असे व्टिट केले आहे.  त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे पार्थ पवार यांना फटकारत त्यांच्या म्हणण्याला कवडीची किंमत नसल्याचे सांगितल्याने. मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते.  दरम्यान पार्थ  यांच्या व्टिटमुळे शरद पवार यांनी फटकारल्यानंतरही पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट झाले असून नातू आणि आजोबा याच्यातील वाद संपल्याचे दिसत नाही.

दरम्यान, पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केले. याविषयी प्रश्न विचारला असता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “पार्थ पवार यांनी काय ट्वीट केले, ते मला माहित नाही. पण त्यांनी जी सीबीआयची मागणी केली होती हे खरेच आहे. त्यांची मागणी आजोबांना आवडली, की नाही आवडली, यावर मला कमेंट करायची नाही. पण त्यांची मागणी एक प्रकारे न्यायालयानेच ग्राह्य धरली आहे. म्हणून कदाचित त्यांनी ते ट्वीट केले असावे” असे फडणवीस म्हणाले. “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढेल. या प्रकरणाची हाताळणी मुंबईत करण्यात आली. या संदर्भात राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे” असेही फडणवीस म्हणाले. “आता हा निर्णय झाल्यावर सीबीआय लवकर चौकशी करेल. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाला आणि त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना या माध्यमातून न्याय मिळेल” अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील या निकालानंतर समूह माध्यमांवर सूचक ट्विट करत ‘अब बेबी पेंग्विन तो गयो… इट्स शो टाईम’, असे लिहिले आहे. ‘या निर्णयासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मला विश्वास आहे जी लवपालवपी होत होती, सुशांतच्या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते त्याला चाप बसेल. तेव्हाच सुशांतला न्यायही मिळेल’, असे राणे म्हणाले.

Social Media