सुशांत सिंहच्या हत्येत आदित्य ठाकरेंचा हात : नारायण राणे

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पदाचा मास्क बाजुला ठेवून केलेल्या टीकेला भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही शेलक्या शब्दात जोरदार प्रत्यूत्तर दिले. शिवसेनेचा दसरा मेळावा हा फक्त आदित्य ठाकरेंना क्लीन चीट देण्यासाठी होता, जनतेसाठी नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अभिनेता सुशांत सिंह याच्या हत्येमागे आदित्य ठाकरेंचा हात आहे, असा थेट आरोप नारायण राणे यांनी केला आहे. सुशांत सिंह याच्या हत्येबाबत आणि दिशा सॅलियनच्या हत्येबाबत सीबीआयचा तपास अजून पूर्ण व्हायचा आहे, त्या आधीच उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाला क्लीन चीट देऊन टाकली, असा आरोपही त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका कराल तर जशास तसे उत्तर देणार असा इशारा नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी शेण गोमुत्र इत्यादी शब्दांचा वापर शोभत नाही त्याचा निषेध करतो असे राणे म्हणाले.

भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्र्याच्या टिकेचा सामना करताना राणे म्हणाले की, कोरोना, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर बोलण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी निर्बुद्ध भाषण केले. उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षण विरोधी आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेचे ५३ आमदार मोदींच्या नावामुळे आले. यापुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे फक्त जेमतेम १० ते १५ आमदार निवडून येणार असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. जीएसटीबबाच उद्धव ठाकरेंना काही कळत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

राणे म्हणाले की “आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री पाहिले त्यांनी आपल्या भाषणाने, शैलीने, विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत. त्यांच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बरळले. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची आब राखली. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत”, असा हल्लाबोल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला.

“राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा त्यांनी कालच्या भाषणात उल्लेख नाही. त्यांनी कालच्या भाषणात ना शेतकऱ्याचा उल्लेख केला, ना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले. कोरोनावर तर ते बोललेही नाही. देशातील सर्वात जास्त ४३ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?”, असा सवालही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना विचारला.

Social Media