या ‘बी पक्ष’ च्या ‘बि’रुदावलीत सारेच गुंतले; तरी भाजपचे काम ‘बि’ घडले ते ‘बि’घडलेच!

राजकीय विश्लेषण, किशोर आपटे

जगद्गुरू संत तुकाराम महाराज(Sant Tukaram Maharaj) यांचे अनेक अभंग आहेत. त्यात मानवी जीवनाच्या अनेक स्थितींबद्दल चर्चा केल्याचे दिसते. तसाच हा अभंग पहा
‘चंदनाच्या संगे बोरी ‘बी’ घडल्या, बोरी ‘बी’ घडल्या चंदनमय झाल्या
सागराच्या संगे नदी ‘बी’ घडली, नदी ‘बी’ घडली सागरमय झाली
परिसाच्या संगे लोहे ‘बी’ घडले, लोहे ‘बी’ घडले सुवर्णमय झाले
विठ्ठलाच्या संगे तुका ‘बि’ घडला, तुका ‘बी’ घडला विठ्ठलमय झाला’

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या(Lata Mangeshkar) ‘चाफा बोलेना’ या अजरामर गिताची रचना करणारे मराठी साहित्यात नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी हे मराठी कवी होते. त्यांनी प्रणयाच्या सामाजिक कौटूंबिक ऐतिहासिक जाणिवाच्या अनेक साहित्य रचना अजरामर केल्या. आता ‘बी’ हा शब्द मराठीत अर्थ पाहिला तर पहिला अर्थ ज्यातून नवे अंकूर येतात त्या ‘बी’ म्हणजे बिया कोणत्याही झाडाच्या, धान्याच्या किंवा नैसर्गिक पध्दतीने नवांकूरातून सृजनाचे काम करणारे नव्या जीवनासाठी आवश्यक बिया, बीज!  दुसरा अर्थ जो तुकोबांना अभिप्रेत आहे तो बी म्हणजे ‘सुध्दा’ या अर्थाने आहे. ग्राम्य मराठीत ‘तुमी बी चला’ म्हणजे तुम्ही ‘पण किंवा तुम्ही सुध्दा’ अश्या अर्थाने तुकोबारायाने हा शब्द वापरला आहे. आता हाच बी इंग्रजीत पहायचे तर ए बी सी डी या वर्णाक्षरातील दुसरे अक्षर बी आहे. तसेच टू बी ऑर नॉट टू बी(To Be Or Not To Be To Be) या शेक्सपियरच्या(Shakespeare) प्रसिध्द संवादातील बी म्हणजे होणे, असणे इत्यादी असा आहे. तर सांगायचे तात्पर्य काय की संत तुकारामांच्या अभंगातील हा बी शब्द सध्या देशात आणि राज्यात वेगळ्याच कारणाने लयभारीच गाजतोय राव! हा बी म्हणजे दुसरे रूप, डुप्लिकेट, प्रतिबिंब असा आहे. येथे हा बी म्हणजे पर्यायवाचक प्रतिकृती या अर्थाने पाहिला जात आहे.

सत्तेसाठी यंत्रणांचा दुरूपयोग सुरू अशी हाकाटी

याचे कारण म्हणजे सध्या देशात भाजपच्या सत्तेचा अश्वमेध चौखूर उधळतो आहे. देशातील चार राज्यात भाजपचा पराभव अटळ मानला जात असताना त्यापक्षाने दोन तृतियांश बहुमत मिळवले आहे. देशात सध्या निवडणूक आयोगापासून केंद्रीय स्वायत्त तपास यंत्रणाना भाजपच्या हिताच्या दृष्टीने बटीक म्हणून वाकवले जात आहे त्यांचा सत्तेसाठी दुरूपयोग सुरू आहे अशी हाकाटी त्यामुळे सुरू झाली आहे. चार राज्यात सत्ता मिळवताना असो किंवा अन्य राज्यात भाजप पेक्षा वेगळ्या पक्षांची सत्ता असेल तेथे असो भाजप कडून त्यांच्या या संस्थाचा गैरवापर सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, अगदी त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती व्ही रमणा यांनी देखील भाष्य केले आहे. तर अश्या या भाजपच्या दबावतंत्राला वश होत सा-या संविधानीक यंत्रणा ‘त्यांना हवे तसेच निर्णय घेत आहेत’, असे सांगितले जाण्याच्या काळात प्रस्थापित लहान मोठ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून भाजपच्या मर्जीत राहून काम करण्याचा कल दिसणे स्वाभाविक आहे. त्यालाच आता भाजपचा बी पक्ष म्हटले जात आहे.

मराठी बाण्याच्या मनसेलाही ‘बी’रुद

तर उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष एमआयएम(MIM) यांच्या सारख्या पक्षांनी भाजपचा बी पक्ष म्हणून काम केल्याचे सांगण्यात येते. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला देखील भाजपचा बी पक्ष म्हटले जाते. आपल्या राज्यात या पूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ला भाजपचा बी पक्ष म्हटले गेले आहे. तर आता पाडव्याच्या मुहूर्तावर मराठी बाणा असलेल्या मनसेलाही हे ‘बी’रुद’ लाभले आहे. कारण त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी भाजपची तळी उचलणारे भाषण करत आपल्या तथाकथित स्पष्टवक्तेपणाचा परिचय देत स्वत:च्या पूर्वाश्रमीच्या पक्षावर त्यात काम करणा-या कुटूंबियांवर टिका केली. राज्यात पहाटेचा शपथविधी करणा-या राष्ट्रवादीला सुध्दा आता ते भाजपचे बी पक्ष आहेत असे हिणवले जाते. तर कधी कधी भाजप मधून खासदारकी सोडून कॉंग्रेस पक्षात गेलेल्या नाना पटोले(Nana Patole) यांच्या सारख्या नेत्यांना सुध्दा ते भाजपच्या बी आघाडी सारखे वागतात म्हणून त्यांच्याच पक्षात टिका केली जाते.

राष्ट्रवादी पासून शिवसेनेपर्यंत सारेच बी पक्ष

या मागचे कारण काय असावे? की काल परवा पर्यंत भाजप सोबत ३० वर्षांची युती असणारा म्हणजे इतके दिवस खराखुरा ‘बी पक्ष’ असलेल्या शिवसेनेने फारकत घेतली आणि चिडलेल्या भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेल्या सत्ता तांडवाला घाबरून सगळेच पक्ष ‘आम्ही बी घडलो तुम्ही बिघडाना’ हा तुकोबांचा अभंग गावू लागले! अनेक वर्ष भाजपची बी पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत नव्या संसाराची चर्चा २०१९ मध्ये करणा-या राष्ट्रवादीच्या नंबर दोनच्या नेत्यासोबत भल्या पहाटे राजभवानावर जावून शपथग्रहण करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कारणाने हा प्रयत्न केवळ ८० तासाचा ठरला आणि राज्यात मविआचे राज्य आले.  त्यामुळे राष्ट्रवादी देखील भाजपचा बी पक्ष आहे होवू शकतो असे स्पष्ट झाले आहे अणि तशी चर्चा राज्यात केली जाते.

‘उडदामाजी काळे गोरे काय निवडती निवडणारे’

पण तरी सुध्दा गेल्या अडीच वर्षापासून या दुभंगलेल्या युतीच्या दोन पक्षांतील आणि फसलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या नात्यातील पक्षांतून दररोज ठिणग्या पडाव्या तश्या नव्या नव्या गोष्टी होताना दिसत आहेत. आता भाजप विरुध्द उरलेले तिघे असा हा राजकीय प्रवास फारकाळ नाही चालणार यांची जाणिव असल्याने राज्यातील अन्य छोट्या पक्षांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूच्या पक्षांचा आहे. मग त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, एमआयएम समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि मनसे तसेच माकप सारख्या किंवा अपक्षांसारख्या छोट्या राजकीय शक्तींच्या पक्षांचा समावेश होतो. पण भाजप वगळून सारे म्हणताना भाजपची बी पार्टी असल्याचा हा शिक्का सध्या बहुतांश सगळ्याच प्रमुख नेते आणि पक्षांना लागतो आहे ‘त्याला बी काय उपाव हाये की नाय राव काही कळेना’! या सगळ्या गोंधळाच्या राजकारणात बीजकारणात सामान्य माणसाला बी काही समजेनासे झाले आहे, त्यांच्यासाठी राजकीय पक्ष कोणताही असो ‘उडदामाजी काळे गोरे काय निवडती निवडणारे’ अशी स्थिती आहे. येत्या काळात देशात लोकशाही अशी हाकली जाणे हे बी फार काही हिताचे नाही ते बी खरेच नाही का?
पूर्ण


‘सत्तातुरांणा न भयं न लज्जा,’ सत्तेच्या साठमारीत सामान्यांचा जीव गुदमरला!

विधिमंडळाच्या चार पाच आठवड्यांच्या अधिवेशनात सामान्य जनतेच्या पदरात काय पडले हा प्रश्न मात्र अनुत्तरीत!

संधीसाधु राज्यकर्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात तरी स्वा. सावरकरांच्या विचारांची, बलिदानाची उपेक्षा थांबवतील का?

Social Media