विधानसभेच्या 12 निलंबित आमदारांची सोमवारी सुनावणी

मुंबई : विधानसभा तालिका अध्यक्षाशी हुज्जत घालून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपाच्या 12 आमदारांना सुनावणी साठी सोमवारी बोलावण्यात आले आहे.

पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी अध्यक्षांच्या दालनात हुज्जत घालून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेऊन भाजपाच्या गिरीश महाजन , आशिष शेलार , डॉ संजय कुटे , जयकुमार रावल , अतुल भातखळकर आदी 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते . सभागृहात न झालेल्या कृत्याबद्दल निलंबित झालेल्या या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती .
मात्र न्यायालयाने आधी विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागण्यास सांगितल्या नंतर या 12 जणांनी अध्यक्षांकडे आपल्या निलंबनावर फेरविचार करण्याची विनंती उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती.

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा अनेकदा उपस्थित झाला होता . विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबद्दल या अधिवेशनात चर्चा झाल्याने या 12 आमदारांना मतदान करता येईल का यावरही बराच खल झाला होता , मात्र निवडणूकच टळल्याने तो विषय तात्पुरता थांबला , मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा प्रकारे आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित ठेवणे योग्य नसल्याचे सभागृहात स्पष्टपणे सांगून आपल्याच सरकारचे कान टोचले होते , या पार्श्वभूमीवर या आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यासाठी येत्या सोमवारी त्यांना उपाध्यक्ष झिरवळ यांच्या दालनात उपस्थित राहण्यासाठीची नोटीस आज बजावली गेली आहे .

Social Media