वैधानिक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी 7 आणि 8 सप्टेंबरला केवळ फक्त  2 दिवसाचे पावसाळी  विधिमंडळ अधिवेशन !

मुंबई  : राज्य विधीमंडळाचे अधिवेशन तीन वेळा प्रलंबित ठेवल्यानंतर अखेर येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार असून त्यात केवळ वैधानिक आवश्यक कामकाज पार पाडले जाणार आहे. दोन्ही सदनांच्या कामकाम सल्लागार समितीची बैठक आज पार पडली त्यात विधानसभा अधिवेशन ७आणि ८सप्टेंबर रोजी कोरोनाच्या प्रतिबंधासाठीच्या सर्व खबरदा-या घेवून पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार सभागृहात शारीरिक अंतराचा नियम पाळायचा असल्याने सदस्यांची आसनव्यवस्था प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत देखील केली जाणार आहे.  त्यापूर्वी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी ६ तारखेला सर्व सदस्यांची अँटिजेंन चाचणी कोरोना चाचणी केली जाणार आहे. प्रत्येक सदस्यांला कोरोना सुरक्षा किट देण्यात येणार असून सदस्यांच्या स्वीय सहायकांना देखील आतमध्ये प्रवेश मिळणार नाही मात्र त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. वाहनचालकांना देखील बसण्याची तसेच त्यांच्या नाश्ता, चहापाणी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असून इतर आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात येणार आहे.

यावेळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना तारांकीत प्रश्न आणि विवीध आयुधामार्फत घेण्यात येणा-या चर्चा होणार नसून केवळ  अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयके घेण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ फक्त २ दिवसाचे अधिवेशन घेवून वैधानिक औपचारीकता पूर्ण केली जाणार आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज होईल, त्यात पत्रकारांना प्रवेश असेल की नाही याबाबत अद्याप स्पष्टता आली नसून सभागृहाशिवाय गँलरीमध्येही सदस्यांची आसन व्यवस्था केली जाणार असल्याने याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. कदाचित पत्रकारांना या वेळी लाईव्ह प्रसारणातून पत्रकार कक्षातून वार्तांकन करण्यासाठी बसावे लागणार आहे. मात्र विधान भवन बाहेर टेंट टाकून इलेक्ट्रॉनिकसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहिती विधान भवनातील सूत्रांनी दिली.

Social Media