40.5 कोटी रुपये मूल्याचा जीएसटी चुकवणाऱ्या वझीर एक्स या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेन्जवर मुंबई जीएसटी आयुक्तालयाची कारवाई

मुंबई, 31 डिसेंबर 2021 : मुंबई झोनच्या पूर्व मुंबई जीएसटी आयुक्तालयाने  40.5 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचे प्रकरण उघडकीला आणले असून वझीर एक्स या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजवर कारवाई केली आहे.  जीएसटी कर,व्याज आणि दंडाची रक्कम म्हणून आयुक्तालयाने 49.20 कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात वसूल केले आहेत.

वझीर एक्स हे विनिमय केंद्र  मेसर्स झानमाई लॅब्ज प्रा लि. कडून चालवले जाते तर डब्लूआरएक्स हे क्रिप्टोकरन्सी चलन मेसर्स बिनान्स इन्वेस्टमेंट कंपनी लिमिटेड या सेशेल्समधील कंपनीच्या मालकीचे आहे. झानमाई लॅब्जने डिसेंबर 2017 मध्ये स्थानिक क्रिप्टोकरन्सी स्टार्ट अप म्हणून वझीर एक्सची नोंदणी केली होती.

हे विनिमय केंद्र व्यापाऱ्याला रुपये किंवा डब्लूआरएक्समध्ये व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. वझीरएक्स प्लॅटफॉर्मकडून डब्लूआरएक्स खरेदी करावे लागते. या विनिमय केंद्राकडून ग्राहक आणि विक्रेता या दोघांकडूनही कमिशनची आकारणी केली जात होती आणि रुपयावरील व्यवहारावर 0.2 टक्के तर डब्लूआरएक्स वर 0.1 टक्के आकारणी होत होती.

ट्रेडींग शुल्क, डिपॉझिट शुल्क आणि विथड्रावल शुल्क म्हणून ही कंपनी कमिशनमधून मोठ्या प्रमाणावर महसूल जमा करत होती असे चौकशीत आढळले. ही कंपनी रुपयावर मिळालेल्या कमिशनवर जीएसटी भरत होती मात्र डब्लूआरएक्स चलनावर मिळालेल्या कमिशनवर जीएसटी भरत नसल्याचे दिसून आले.

या व्यवहारावरील शुल्क म्हणून 18 टक्के दराने जीएसटी लागू होतो. अशा प्रकारे सुमारे 40.5 कोटी रुपयांचा जीएसटी भरला गेला नव्हता. हा कर आणि व्याज आणि दंडासह एकूण 49.2 कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात वझीरएक्सकडून जागीच वसूल करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मुंबई झोनच्या सीजीएसटी  विभागाचे अधिकारी ई कॉमर्स, ऑनलाईन गेमिंग, नॉन फंजीबल टोकन आणि इतर उदयोन्मुख क्षेत्राशी निगडित व्यावसायिक व्यवहारांचा तपास त्यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य करचुकवेगिरीची शक्यता लक्षात घेऊन अधिक काळजीपूर्वक करत आहेत.

मुंबई झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व क्रिप्टोकरन्सी विनिमय केंद्रांची तपासणी सीजीएसटी विभाग करणार असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.

Social Media