मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असले तरी मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर रखडलेल्या अकरावीची प्रवेशप्रक्रियेचे काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुंबईत येण्याची वाट पहात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होईल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर उपसमितीची बैठक होईल.
या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल अशी माहिती या सूत्रांनी दिली. मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सरकार यासाठी जबाबदार असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. तर मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याप्रकरणी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करु, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
शाळा सुरु करण्याबाबत संस्था चालकांबरोबर चर्चा झाली. मात्र संस्था चालकांची अजूनही शाळा सुरु करण्याची मानसिकता नाही. शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत जिल्ह्यातील पालकमंत्री आणि पालकांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. ही चर्चा झाल्यानंतरच उद्धव ठाकरे याबाबत निर्णय जाहीर करतील.