ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक प्रकाश एदलाबादकर(Prakash Edalabadkar) हे दररोज समाजमाध्यमावर सक्रिय असतात. आज सकाळी फेसबुक(Facebook) उघडले आणि नागपूरचा “आलूबोंडा विथ तर्री” ही प्रकाशने टाकलेली पोस्ट पाहिली.
नागपुरात(Nagpur) “आलुबोंडा विथ तर्री” हे काही पोट भरण्याचे साधन नाही, तर ती एक संस्कृती आहे, हे अगदी १० वर्षापासून तर ८५ वर्षांपर्यंतचा कुणीही व्यक्ती मान्य करेल. त्यामुळे प्रकाशचा हा स्फुट वजा लेख सर्वांनी आवडीने वाचला असणार यात शंका नाही.
याच लेखात प्रकाशने आलू बोंडा(Aloo bonda) बरोबर समोस्याचाही उल्लेख केला आहे. नागपुरात अनेक ठिकाणी तर्री पोहे, आलू बोंडा यासोबत दही समोसा(Dahi samosa) किंवा समोसा तर्री(Samosa tarri) हा प्रकारही आवडीने खाल्ला जातो.
आज हा लेख वाचताना मला नागपूरच्या लक्ष्मी भुवन चौकातील (Laxmi Bhuvan Chowk)संगम रेस्टॉरंट मधला प्रसिद्ध लालाजीचा समोसा (Lalaji’s samosa)आठवला आणि आज जवळजवळ चाळीस वर्षांनी देखील तोंडाला पाणी सुटले.
लक्ष्मीपूजन चौकातून जोशी मंगल कार्यालयाकडे जायला उजव्या हाताला वळल्यावर अगदी दुसऱ्याच बिल्डिंगमध्ये हे लालाजीचे प्रसिद्ध संगम हॉटेल होते. या हॉटेलचे मालक लाल बहादुर सिंह भदोरिया हे लालाजी(Lalaji) म्हणूनच ओळखले जात होते. लालाजी (Lalaji)ही एक व्यक्ती नव्हती, तर ती एक संस्था होती. अफाट जनसंपर्काचा धनी असणारा हा माणूस सकाळपासून तर रात्रीपर्यंत स्वतः ग्राहकांना समोसा बनवून द्यायचा. समोसा देता देता त्या ग्राहकाची पूर्ण चौकशी सुद्धा लालाजी करायचा. काही वेळातच नवखा ग्राहक हा लालाजीचा जिवलग होऊन जायचा..
लालाजी(Lalaji) सकाळपासूनच गरम समोसे(samosa) बनवायला घ्यायचे. ग्राहकांनी समोसा मागितला की प्लेटमध्ये दोन समोसे ठेवून ते हाताने थोडे कुचकरायचे आणि त्यावर छान घट्ट दही, सोबत चिंचेची चटणी, लाल मिरचीचा ठेचा ची चटणी, असे सर्व काही टाकायचे. त्यावर मग थोडा बारीक चिरलेला कांदा (onion)आणि कोथिंबीर(Cilantro) बारीक केलेली टाकायची, आणि ती प्लेट बरेचदा लालाजीच स्वतः ग्राहकाला पोहोचवून द्यायचा. लालाजीच्या या दही समोस्याचे अनेक मान्यवर फॅन होते म्हटले तरी वावगे ठरू नये. सकाळी सुभेदार हॉल किंवा महाराज बाग(Maharaj Bagh) क्लब मधून बॅडमिंटन (Badminton)खेळून येणारे मग ते शहरातले प्रसिद्ध डॉक्टर चोरघडे असो की उद्योजक रवी लेले असो, ते दररोज सकाळी तिथे हजेरी लावायचेच.
शिक्षण संपवून मी १९७५ च्या सुमारास प्रेस फोटोग्राफी सुरू केली. त्यावेळी लक्ष्मी भुवन चौकातच लालाजीच्या अगदी हॉटेल समोर एक गाळा घेऊन मी फोटोग्राफीचा स्टुडिओही लावला होता. सकाळी साडेसात आठ वाजताच मी घरून निघून स्टुडिओत पोहोचत असे. आदल्या दिवशीच्या फिल्म्स सकाळी नऊ सव्वानऊ पर्यंत डेव्हलप करून वाळायला टांगल्या, की स्टुडिओ बंद करून मी लालाजीच्या संगम हॉटेलमध्ये पोहोचत असे. तिथे लालाजीचा तो ऐतिहासिक गरम समोसा चवीने खायचा. सोबत लालाजी एक हाफ देना, असे सांगून समोर आलेला अर्धा कप चहा(tea) प्यायचा, आणि मग पुढच्या कामाला जायचं हा अनेक वर्ष माझा जीवनक्रम होता. हा समोसा सकाळीच पोटाला आधार होत होता असे नाही, तर कित्येकदा दुपारी घरी जायला उशीर झाला किंवा संध्याकाळी कामाचे लोड वाढले की देखील लालाजीकडे पटकन जाऊन समोसा खाऊन येण्याचा कार्यक्रम असायचा. काही वेळा मग लालाजी कडून पार्सल करून समोसा स्टुडिओत आणून खाण्याचा कार्यक्रम असायचा. त्यावेळी लालाजी दही टाकून समोसा न देता लाल मिरच्यांची कोरडी चटणी आणि बारीक चिरलेला कांदा सोबत देत असे. तो गरम समोसा आणि लाल मिरच्यांची चटणी ही देखील अतिशय चविष्ट लागायची. या समोसा मैफिलीत अनेकदा सुनील मांडवकर, शशांक मसाळकर हे सहकारी, तर जयंत वाघ, सुधाकरराव फाटक असे मित्रही सहभागी असायचे. जयंत वाघच्या मते तर आम्ही कित्येक वर्ष लालाजीच्या समस्यावरच जगलो होतो.
नंतर लक्ष्मीभुवन चौक सुटला. दरम्यानच्या काळात ज्या इमारतीत लालाजीचे हॉटेल होते, ती इमारतही पाडलेली गेली. कधी मधी लालाजीची भेट व्हायची. काही वर्षांपूर्वी लालाजी वारल्याची बातमी नागपूरच्या वर्तमानपत्रांमध्ये वाचली. मात्र अजूनही त्या चौकात गेलो की लालाजी चा समोसा हमखास आठवतो. आजही हे स्फुट लिहितांना लालाजीचा प्लेट मधल्या समोसा आणि चटणी डोळ्यासमोर येते आहे.
तसाही समोसा हा कायम माझा वीक पॉईंटच राहिला आहे. आज लालाजीच्या समोस्यांचा किस्सा ऐकवला. अजून कधीतरी इतर ठिकाणच्या समोस्यांचाही किस्सा ऐकवेनच.
अविनाश पाठक ….