मुंबई : मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे यासंदर्भात मागणी केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सर्व अत्यावश्यक सेवेतील शासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचारी विशेषतः महिलांनाही कार्यालयात किंवा कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने रेल्वेने प्रवास करण्यासाठी क्यू-आर कोडसहित पासेसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तथापि, बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्यू- आर कोड पासेस उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे पर्यायाने त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसने प्रवास करावा लागत आहे.
बसने प्रवास करण्याकरिता दररोज तास- दोन तास बसची प्रतीक्षा तसेच बस उपलब्ध झाल्यानंतरही त्यांना दोन-तीन तास प्रवास बसने करावा लागत आहे. विशेषतः महानगरामध्ये बसने येण्याजाण्यास खूप अडचणी येत आहे. तसेच बससेवेला होत असलेली गर्दी पाहता त्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीय व खाजगी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे ॲड. ठाकूर यांनी म्हटले आहे.