NDA ला अपेक्षित बहुमत न मिळाल्याने शेअर बाजारात घसरण

मुंबई : आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या(Lok Sabha elections) निकालाचे मोठे पडसाद शेअर बाजारावर उमटले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात NDA सरकारला अपेक्षित बहुमत मिळत नसल्याचे स्पष्ट होऊ लागल्यानंंतर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा (Bombay Stock Exchange)सेन्सेक्स ४३९० अंकांनी घसरून ७२०७९ अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी(Nifty) १३७९ अंकांनी घसरून २१८८४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गौतम अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २१ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली. बँक निफ्टी(Bank Nifty) निर्देशांक सुमारे ८ टक्क्यांनी घसरला, तर निफ्टीचा मिडकॅप १०० देखील सुमारे आठ टक्क्यांनी घसरला. BSE स्मॉल कॅप निर्देशांक सात टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

आज शेअर बाजाराला कोरोना संकटानंतर एका दिवसातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. दिवसाच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स एकदा ६१०० अंकांनी घसरला आणि ७०,३०० च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. तसेच राष्ट्रीय शेअर बाजारच्या निफ्टीनेही दुपारी १२ वाजताच्या सुमारास २१२८५ चा नीचांक गाठला होता. मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजात ८० टक्के कंपन्यांचे समभाग घसरले.

शेअर बाजारात पीएसयू, रेल्वे आणि संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. BHEL चे समभाग २१ टक्क्यांनी घसरले, तर कंटेनर कॉर्पोरेशन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, BEML लिमिटेड, टिटागड रेल्वेचे समभाग टॅक्स मेको रेल, माझगाव डॉक, इरकॉन इंटरनॅशनल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि गेल इंडिया लिमिटेडचे सम‌भाग सुमारे २० टक्क्यांनी घसरले,शेअर बाजारात मोठी घसरण होऊनही आज हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, हिरो मोटोकॉर्प, नेस्ले इंडिया, टाटा कंझ्युमर, सिप्ला आणि टीसीएस यांच्या समभागांनी वाढ नोंदवली, तर अदाणी पोर्ट्स २१ टक्के, अदाणी एंटरप्रायझेस २० टक्के, ओएनजीसी १७ टक्क्यांनी घसरले. एनटीपीसी १५ टक्क्यांनी घसरले, कोल इंडिया १४ टक्क्यांनी खाली आले आणि लार्सन अँड टुब्रो १३ टक्क्यांनी घसरले.

Social Media