महाड : ४८ तासात महाड(Mahad), पोलादपूरच्या(Poladpur) सर्व भागांमध्ये पडणाऱ्या अतिवृष्टीने पूर सदृश्य स्थिती निर्माण केली असून दोन्ही तालुक्यात सावित्री नदीने (Savitri River)धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने पहिला भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारे दिले आहेत.
दरम्यान महाबळेश्वर(Mahabaleshwar) आणि पोलादपूर(Poladpur) येथे मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने महाड- पोलादपूरकरांसाठी आजची रात्र धोक्याची असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. मागील ४८ तासात महाड- पोलादपूर(Poladpur) तालुक्याच्या सर्व ग्रामीण भागांमध्ये तसेच शहरात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून सद्यस्थितीमध्ये महाडच्या महिकावती मंदिराजवळ असणाऱ्या शासकीय यंत्रणेनुसार सध्याची या ठिकाणची पाणी पातळी सहा पूर्णांक ५० दशांश एवढी झाल्याने नगरपालिकेकडून इशाराचा पहिला भोंगा नागरिकांसाठी वाजविण्यात आला आहे .
महाड तालुक्याच्या रायगड वाळण परिसरामध्ये तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून वाळण विभागात एका ६२ वर्ष ज्येष्ठ नागरिकाचा ओढ्यात पडून वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली आहे.
मागील ४८ तासात होणाऱ्या तुफानी मुसळधार पर्जन्यवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे महाबळेश्वर येथेही गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलादपूर तालुक्यात पडणाऱ्या पावसाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
या दोन्ही तालुक्यात स्थानिक प्रशासन येणाऱ्या सर्व आव्हानात्मक परिस्थितीला सज्ज असल्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाडमध्ये असणाऱ्या एन डी आर एफ च्या पथकाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लाडवली पूल छोट्या वाहनांसाठी खुला आहे. महाड – किल्ले रायगड मार्गावरील गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेला लाडवली पुलाचे काम पूर्ण झाल्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाची नोंद घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गावरून छोट्या वाहनांमधून जाण्यासाठी हा मार्ग खुला केल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील सुमारे पाच हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे मागील सुमारे एक महिन्यापासून या पुलाच्या झालेल्या विलंबाच्या कामाने नागरिकांना सात दिवस पर्यायी मार्गावरून सुमारे पाच किलोमीटर लांबीचा फटका घालून महाड शहरामध्ये जावे लागत होते. मात्र आज सकाळपासून छोट्या वाहनांसाठी हा मार्ग खुला करण्यात आल्याची माहिती प्रशासनामार्फत तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.