मंकी बात…

लांबलेला निवडणुकीचा पाळणा, महायुतीची योजना! महाआघाडीच्या पथ्यावर?

महाराष्ट्रात(Maharashtra) गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिका निवडणुका(Elections) होऊ शकल्या नाहीत. सुरुवातीला ओबीसी आरक्षण(OBC reservation) आणि नंतर प्रभाग रचना मधील फेरबदल आणि त्यावरून झालेली कोर्टबाजी यामुळे या निवडणुका रखडत पडल्या आहेत. त्यातून महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थातील लोकशाही नष्ट होवून तेथे राज्यात सत्तेवर असलेल्या सत्ताधाऱ्यांचे प्रशासक राज्य करत आहेत हीच गोष्ट आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत घडली आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने(Central Election Commission) देशातील येत्या सहा महिन्यात होऊ घातलेल्या चार पैकी केवळ दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा(Assembly elections) कार्यक्रम जाहीर केला आहे. झारखंड (Jharkhand)आणि महाराष्ट्रात(Maharashtra) मात्र निवडणुका टाळल्या आहेत. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणेच आता महाराष्टात निवडणुका होतील की नाही आणि झाल्याच तर त्या नक्की केव्हा होणार? याची कोणतीही शाश्वती देता येत नाही.

Central-Election-Commission

केंद्रात भाजपची(BJP) बहुमताची सत्ता जावून एनडीएची(NDA) घटकपक्षांवर आधारित सत्ता असूनही मोदी आणि शाहा यांच्या वागण्यात तसूभरही फरक पडलेला नाही. त्यांनी झारखंड मध्ये हेमंत सोरेन(Hemant Soren) यांची सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन कमळ (Operation Lotus)सुरू केले आहे आणि महाराष्ट्रात दोन वर्षापुर्वी जसे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे विश्वासू समजले जाणारे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना फोडून आपले अंकीत बनवले तसेच हेमंत सोरेन यांचे विश्वासू चंपई सोरेन(Champai Soren) यांना फोडून आपल्या कच्छपी लावले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील मोदी-शहा पुन्हा एकदा मराठी अस्मितेवर घाव घालतील आणि शरद पवार (Sharad Pawar)उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना साम दाम दंड भेद नीती वापरून जेरीस आणायचा प्रयत्न करतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. याची सुरुवात अकोला येथील ठाकरेंचे निष्ठावान नितीन देशमुख(Nitin Deshmukh) यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु करून करण्यात आली आहे. लवकरच पवार-ठाकरे यांच्या निकट वर्तुळात अनेकांना सत्वपरिक्षेला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

Eknath-Shinde

इजा बिजा तिजा खूप झाली मजा असे म्हणत महायुती मध्ये सध्या आनंदी आनंद आहे. सध्या लाडकी बहिण योजना घोड्यावर स्वार होवून चौखुर उधळली आहे गरीब लाडक्या बहिणीच्या खात्यात एक ते तीन हजार रुपये जमा झाले आहेत. ते काढण्यासाठी बहिणींची बँकात झुंबड उडाली आहे. त्यामुळे साऱ्या बँका कशा बहिणींच्या गर्दीने फुलून गेले आहे पण गमंत अशी की, ‘राजा उदार झाला, हाती भोपळाच दिला’ असा अनुभव देखील अनेक बहिणींना येत आहे. अनेक बहिणींच्या बँक खात्यातून 1500 ऐवजी काटून कुटून 1000-1200  रुपयेच हाती पडले आहेत. काही ठिकाणी तर चमत्कार व्हावा तसे भलत्याच खात्यात पैसे जमा होत आहेत. अनेक बहिणींच्या खात्यात अर्ज पात्र होवूनही अद्याप पैसे जमा न झाल्याने त्या बँक्यांच्या चकरा काटू लागल्या आहेत. जालन्यात तर चक्क एका मुस्लिम भावाच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेत. हे सुद्धा या महत्वाकांक्षी योजनेचे घवघवीत यशच म्हणायला हवे. पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलात अक्षरश: हजारोंच्या गर्दीसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या सोबत लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ केला. त्यावेळी बोलताना वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांना साक्षी ठेवून मुख्यमंत्र्यानी बहिणींना आश्वासन दिले आहे की लवकरच ही योजना कायमस्वरुपी लागू करून तिच्या निधी मध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली जाईल. हे सांगत असताना दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्वत: मुख्यमंत्री यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. याचे कारण आताच या योजनेसाठी राज्यसरकारने अर्थसंकल्पातील अनेक कामांना कात्री लावली आहे.

45 हजार कोटी एक वर्षात सुमारे 3 कोटी बहिणींना वाटायची तरतूद करण्यात आली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांची देणी भूसंपादनाचे मोबदले कर्जाचे व्याज प्रदान, जुन्या कर्जाचे परतफेड केंद्रिय योजनांसाठी अंशदान, शालेय विद्यार्थ्यांच्या सवलती अनुदान, सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहामधील विद्यार्थ्यांचे अनुदान, शैक्षणिक संस्थांचे अनुदान असे हजारो विषय पैशाअभावी ठप्प पडले आहे. या साऱ्या कामकाजासाठी राज्यसरकारला नव्याने कर्ज काढावे लागणार आहे. सुमारे एक लाख 40 हजार कोटींचे नवे कर्ज येत्या अर्थसंकल्पीय वर्षभरात सरकार घेणार आहे. त्यामुळे सरकारवरील कर्जाचा बोजा 8 लाख कोटी पेक्षा जास्त होणार आहे तरी देखील सन 2024-25 च्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात सुमारे दोन लाख कोटींची तूट येण्याची शक्यता आहे. येत्या कालखंडात जागतिक मंदीचे सावट आर्थिक क्षेत्रात येवू घातले आहे तर राज्यात सध्या मान्सून चांगला असला तरी कृषी उत्पन्न भरीव न झाल्यास राज्याच्या महसूलात मोठ्या प्रमाणावर तूट येणार आहे त्यामुळे येत्या कालखंडात राज्यात सत्तेवर येणाऱ्या कोणत्याही पक्षात आघाडीच्या सरकारला राज्य चालवणे कर्मकठीण होवून बसणार आहे.

विधानसभा- निवडणुक

ते काहीही असले तरी सध्या महायुतीमध्ये निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. गुलाबी रथावर अजित पवार(Ajit Pawar) पश्चिम महाराष्ट्रचा दौरा करून आपली प्रतिमा ‘प्रत्यक्षाहून उत्कट’ करण्यात दंग आहेत. त्यासाठी त्यांनी एजन्सीच नेमली आहे तर कर्मवीर मुख्यमंत्र्यांनी बैठकांचा, आश्वासनांचा सपाटा लावला असून ‘जो जे वांछिल तो ते लाभो’ अशा भूमिकेत ते आहेत. तरीही राज्यमंत्रिमडळात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात भांड्याला भांडी लागल्याचे आवाज ऐकू येत आहेत. तर अजित पवारांच्या दौऱ्यात भाजपचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवले म्हणून अटक केले जात आहेत असा सारा आनंदी माहोल असल्याने महिनाभर पुढे ढकललेल्या निवडणुकांच्या तिकीट वाटप आणि जागा वाटप दरम्यान महायुतीत दांडीया रंगण्याची खात्री दिली जात आहे. दिवाळीनंतर होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयाची खात्री आहे. कारण त्यांच्याकडे गावोगावच्या गरीब बहिणी आणि भावांना वाटलेल्या सरकारी अनुदानाच्या याद्या आहेत.राज्याच्या सुमारे 300 तालुक्यात प्रत्येकी दोन ते पाच हजार गरजू बहिणींची यादी कार्यकर्त्यांच्या हाती आहे. जोडीला बेरोजगार भाऊ, जेष्ठ नागरिक आणि इतर कार्यकर्ते अशी गर्दी जमवणे सोपे झाले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक तालुक्यात किमान 10 ते 20 सभा लहानमोठ्या होणार आहेत. त्यात ही हक्काची गर्दी नेता येणार आहे त्यांनाही त्यातून 10-15 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. आणि तीन लाखाच्या विधानसभेत 50 टक्के होणाऱ्या मतदानात लाखभर मते सहजपणे गोळा करता येतील असा अंदाज महायुतीचे चाणक्य तोंडावर सांगत आहेत. त्यांचा हा आत्मविश्वास विधानसभेच्या निकालानंतर खरा की खोटा ते समजणार आहे पण फ्रीबीज च्या नावानं ‘उखळ पांढेरे’ करून घेणाऱ्यांची मात्र चलती होणार आहे, हे ही नसे थोडके!

Uddhav-Thackeray

‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी मायबोली मराठीत म्हण आहे. लोकसभा निवडणुका जशा पाच टप्प्यात घेवून महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी यंत्रणा राबवण्यात आल्या त्यातूनच शरद पवारांसारखे चाणाक्ष नेत्यांनी वेळेचा पुरेपूर फायदा घेत मोर्चेबांधणी केली आणि यशस्वी रणनीती आखून 48 पैकी 31 जागा पदरात पाडून घेतल्या तसेच महाराष्ट्रात लांबलेल्या निवडणुकीच्या पाळण्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे चाणाक्ष नेते शरद पवार गावोगावच्या निवडणुकांची गणिते आरामात मांडू शकतील आणि जेथे शक्य आहे तेथे जागा खिशात टाकतील आणि श्यक्य नाही तेथे राजकीय चक्रव्यूह तयार करून अपक्षांचे गोतावळे उभे करतील अशी शक्यता राजकीय पंडित व्यक्त करत आहेत. कारण पवार हे एकमेव नेते आहेत ज्यांना तळहातासारखा महाराष्ट्र वाचता येतो. 1995 मध्ये पवारांनी काँग्रेसला बाजूला ठेवून राज्यात 45 पेक्षा जास्त अपक्षांची फौज निवडून आणली होती. यावेळी ती 50 पेक्षा जास्त ते निवडून आणू शकले तर निवडणुकांनतर सत्तेच्या बुद्धीबळात देखील त्यांचा वजीर चेकमेट च्या भूमिकेत पुढे राहणार आहेत हाती आलेल्या निवडणूक सर्वेक्षणानुसार भाजपला 50 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता नाही तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे भवितव्य 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निकालावर ठरणार आहे. एकुणच राज्यात सध्या अपक्षांच्या अपेक्षा वाढवण्याचे राजकारण वाढीस लागण्याची शक्यता आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे!

 

किशोर आपटे

राजकीय विश्लेषक

 

मंकी बात…

मंकी बात…

Social Media