पुणे : बदलापुरात(Badlapur) चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणात भयानक घटनांची मालिका सुरु असतांनाच आता पुण्यात पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली आहे. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. एका नामांकित कॉलेजमध्ये ‘गुड टच बॅड टच’ (Good touch bad touch)कार्यशाळा सुरू असताना एका विद्यार्थिनीच्या खुलाश्यानंतर जे समोर आले त्यातून तिच्यासोबत अत्याचार झाल्याचे ऐकून सर्वांना धक्काच बसला. आणि तातडीने पोलीसांना याबाबत वर्दी देण्यात आली.
दोन दिवसांपूर्वीच चार तरूणांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेची माहिती उघड होताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं असून त्यांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असून ती कोरेगाव पार्क (Koregaon Park)पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकते. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या चौघांपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असून ते ११ वी आणि १२ वीत शिकत आहेत. पुणे पोलिसांनी पोक्सो कायदा आणि बीएनएसच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमध्ये ‘गुड टच आणि बॅड टच’(Good touch bad touch) या विषयावर वर्कशॉप सुरू होते. त्याचदरम्यान एका विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीसोबत काही दिवसांपूर्वी घडलेली घटना सांगितली. त्या मुलीच्या मैत्रिणीसोबत घडलेला प्रकार ऐकून शिक्षकही हादरले. त्यांनी तातडीने त्या पीडित मुलीच्या पालकांना बोलावून घेतले आणि संपूर्ण प्रकार त्यांच्यासमोर कथन केला. आपल्या मुलीसोबत घडलेली घटना ऐकून ते हादरले, मात्र त्यांनी अन्यायायाला वाचा फोडण्याचा निर्धार करत पोलिस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली.
त्या अल्पवयीन पीडित मुलीच्या सांगण्यानुसार, चार मुलांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यापैकी एक मुलगा हा तिच्याच कॉलेजमधला आहे, तर इतर तिघांशी तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर ती मुलगी त्या आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटली आणि त्यांनी तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.