मुंबई : “दुनिया रंग बिरंगी ” अशा लोकांसाठी असते ज्यांची सर्व ज्ञानेंद्रिये कार्यक्षम आहेत. परंतु समाजात काही दिव्यांग
मुलं असतात. या मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.काही वेळा या मुलांना समाजाबरोबर कुटुंबातील सदस्य सुद्धा नाकारतात. परंतु समाजामध्ये काही अशा संघटना आणि व्यक्ती आहेत ज्या या मुलांसाठी आपले सर्वस्व पणाला लावतात आणि त्यांच्या कल्याणासाठी झटतात.
याच व्यक्तींपैकी दोघी जणी म्हणजे यश कौर मेहरा आणि दीप्ती प्रदीप या होत . या दोघींनी काही दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने नुकताच दिव्यांग मुलांच्या मनोरंजनासाठी
“दुनिया रंग बिरंगी ‘ हा कार्यक्रम नवी मुंबईतील भारतीय विद्या भवनच्या सभागृहात आयोजित केला होता.
यावेळी विविध दिव्यांग बालकांनी आपल्या कला गुणांचे प्रदर्शन करून इतर दिव्यांग मुलंमुली,त्यांचे पालक आणि उपस्थित सर्व मान्यवरांची मने जिंकली. सर्व उपस्थित टाळ्यांच्या गजरात या बालकांना प्रोत्साहन देत राहिले.
या कार्यक्रमात सनसाईन फाऊंडेशन शाळा,आरंभ फाऊंडेशन शाळा आणि ईटीसी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.
या तीनही शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि कलागुणांना वाव देण्याचे कार्य करत आहे
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री मधू भतिजा,मेन्टोर रोटरी क्लब,नवी मुंबई, न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ,कवि व अभिनेता झाकीर हुसेन, ज्येष्ठ अभिनेते माझीज खान, अभिनेता गिरीश थापर, ज्येष्ठ अभिनेत्री व प्रोडयूसर जया खन्ना, समाजसेविका उषा दत्त, शारदाई फाऊंडेशनचे अमित सर आणि शुभांगी मॅडम, शशिकांत माधव पाटील,गुंज आणि राॅयल अकॅडमी , अभिनेते प्रकाश राणे, दूरदर्शन चे निवृत्त संचालक चंद्रकांत बर्वे, प्रभाकर आदि मान्यवर उपस्थित होते .या सर्व मान्यवरांनी बालकांच्या कलागुणांचे कौतुक केले.
आमच्या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी या पुढेही. सतत कार्य करत राहू अशी ग्वाही यश कौर मेहरा आणि दीप्ती प्रदीप यांनी यावेळी बोलताना दिली.