मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांच्या हिंदुसमाजाबाबतच्या नव्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. “गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत”, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांनी केलं आहे. तसेच “महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात”, असंदेखील वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता संभाजी बिग्रेडचे नेते संतोष शिंदे(Santosh Shinde) यांनी संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
“मनोहर उर्फ संभाजी भिडे हा अत्यंत विकृत माणूस आहे. हिंदू स्त्रिया असो की हिंदू समाज यांच्या विषयी नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत असतो. समाजात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा आणि महाराष्ट्रात दंगली घडवणारा मनोहर भिडे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. राज्यात जातीवादी वाईट घटनेचा मास्टरमाईंड आहे. अशा विकृत व्यक्तीला सरकारने पाठीशी घालू नये”, असं संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे म्हणाले आहेत.
“हिंदूंना महामुर्ख आणि गांडू म्हणणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडे याला तात्काळ अटक करून सरकारने कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी संभाजी ब्रिगेडची सरकारकडे मागणी आहे. भिडेच्या वक्तव्याला सरकार नेहमी पाठीशी घालत आहे. सरकारने हिंदूंना महामूर्ख म्हणणाऱ्या या वक्तव्याला गप्प बसून पाठिंबा देऊ नये. अन्यथा सरकारची भूमिका महाराष्ट्राच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. भिडेला तात्काळ आता अटक करा”, अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनीदेखील संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “संभाजी भिडेंच्या डोक्यात काय सुरू असतं हे समजायला मार्गच नाही. पूर्ण समाजाला गांडू म्हणणं हे त्यांना शोभत नाही. संभाजी भिडे यांचं वय झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये आणि मानसिक स्थैर्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फारसं महत्त्व देणं काही योग्य वाटत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्यातच बट्ट्याबोळ झालेला आहे. हिंदू समाजाचे ते एकटेच करतेधरते आहेत. हिंदू समाज त्यांच्या बोलण्यानुसार ऐकतो हा त्यांचा गोड गैरसमज आहे. मला असं वाटतं, वयानुसार मानसिक संतुलन ढळतं, असं म्हणतात. त्यांनी तपासून घ्यावे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.