२०० एकरवर पार्किंगची तर मंगल कार्यालयांत राहण्याची व्यवस्था!
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांचा दसरा मेळावा गाजत आलेला आहे. मुंडे यांनी जिल्ह्याच्या सीमेवर भगवान गडावर दसरा मेळावा सुरू केला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर ही परंपरा पंकजा मुंडे यांनी सावरगावात भगवान भक्ती गडावर सुरू ठेवली आहे. माजी आमदार सुनील धांडे यांनी नारायण गडावर दसरा मेळावा सुरू केला होता. मात्र त्यानंतर त्यात खंड पडला. दिवंगत विनायक मेटे यांनी पुढे या दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली. पण मेटे यांच्या निधनानंतर हा दसरा मेळावा बंद झाला. ती परंपरा आता मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) चालविणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी सहाव्यांदा सुरू केलेले उपोषण स्थगित केले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पाटील यांचा दसऱ्याला भव्य मेळावा होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून याची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
बीड(Beed) जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड (Shri Kshetra Narayan Gad)या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. नारायणगडावर १७५ एकर मैदानात हा मेळावा होणार असून २०० एकरवर पार्किंगची व्यवस्था केली आहे. दरम्यान झालेल्या बैठकीत वीस लाखांचा निधी प्राप्त झाला आहे तर मुस्लिम समाजानेही देणगी दिली आहे.
राज्यातील मराठयांची इच्छा होती दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यासाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. दसरा मेळाव्याला तुफान पोर येणार आहेत. कधी दसरा येतो अशी खूप आशा लागली आहे. कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा आहे. दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नारायणगडावरील दसरा मेळाव्याला या, असे मनोज जरांगे म्हणाले.