ठाणे : डोळ्यांच्या कडा ओल्या होण्याचे आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अंगातील सुप्त कलागुणांचा त्यांचा अविष्कार पाहताना मन भरून येण्याचे अनेक हृद्य क्षण रविवारी ठाण्यात झालेल्या दिव्यांग कला महोत्सवानिमित्त(Divyang Arts Festival) प्रेक्षकांना अनुभवण्यास आले.
अखिल भारतीय बालरंगभूमी परिषदेतर्फे(All India Children’s Theatre Council) आयोजित ‘यहाँ के हम सिकंदर’ या विशेष मुलांसाठी आयोजित कला महोत्सव विशेष मुलांनी गाजवला. ठाणे शाखेने येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात आयोजित केलेल्या उपक्रमात २० दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांनी नाच, गाणी, नाटके आदी कला सादर केल्या. सात शाळांतील मुलांनी त्यांनी बनवलेल्या वस्तूंचे स्टॉल लावून विक्री केली.
अ. भा. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अभिनेत्री सौ. निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते या कलामहोत्सवाचे उदघाटन झाले. ‘या विशेष मुलांमधील निरागसता सर्वसामान्य माणसांना बरेच काही शिकवून जात असते. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन बालरंगभूमी परिषद त्यांना मुख्य प्रवाहात आणू पाहत आहे’, असे त्या म्हणाल्या. ठाणे शाखेच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी सुयोग्य आयोजनाबद्दल कौतुक केले. यावेळी केंद्रीय पदाधिकारी कार्याध्यक्ष राजू तुलालवार, वैदेही चवरे आणि नागसेन पेंढारकर उपस्थित होते.
ठाणे शाखेतर्फे स्वागत करून श्री. मिलिन्द बल्लाळ यांनी कला महोत्सवामुळे समाजातील वंचित आणि उपेक्षित वर्गाला सामावून घेण्याची संधी मिळाल्याबद्दल सौ. निलम शिर्के-सामंत यांचे आभार मानले. समाजात संवेदना जीवंत ठेवण्यासाठी ठाणे शाखा परिषदेतर्फे दिलेले सर्व उपक्रम यशस्वी करणार असल्याचे ते म्हणाले. कला महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदार टिल्लू, अमोल आपटे, मेघना साने, सुचेता रेगे, नूतन बांदेकर, दयानंद पाटील, पी. एन. पाटील, राजेश जाधव, सुनिल जोशी, स्वाती आपटे, प्रणाली गंधे आदींनी मेहनत घेतली.
कला महोत्सवात आशीर्वाद देण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ सौ. मीरा कोर्डे, चित्रकार विजयराज बोधनकर, प्रा. प्रदीप ढवळ, आर्थिक पाठबळ देणारे व्ही. चंद्रशेखरन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा कदम आणि सविता चौधरी यांनी केले.