महाराष्ट्रात(Maharashtra) मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या खेळाची इतिश्री होण्याचा परमोच्च बिंदू अगदी जवळ महिनाभरावर येवून ठेपला आहे. मागील दोन वर्षात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जे दावे आणि वादे करण्यात आले त्यात अंतिमत; जनतेच्या दृष्टीने कुणाचे पारडे जड आहे, किंवा कुणाची बाजू रास्त आहे ते समजण्यास आता फार कालावधी राहिला नाही.
असे असले तरी निवडणूक यंत्र आणि यंत्रणा यांच्यात जो काही घोळ घातल्या गेल्याचा अनुभव आणि संशय विरोधकांकडून व्यक्त होत आहे त्या पार्श्वभुमीवर खूपच गंभीर आणि चिंताजनक स्थिती आहे. देशाच्या संसदीय लोकशाहीच्या व्यवस्था केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थ आणि राजकीय अजेंड्यासाठी कश्याही लवचिकतेने वाकवण्याचा जो परिपाठ आहे तो काही नवा नाही. कॉंग्रेसच्या काळातही ते ब-याच प्रमाणात होत होते, पण अगदीच कमरेचे सोडून. .म्हणतात तसा प्रकार आता सुरू झाला आहे की काय? असे जे सांगण्यात येते तशी स्थिती यापूर्वी जाणवली नाही.
एकीकडे पक्षांमध्ये आयाराम गयाराम सुरू आहे, प्रवेशांच्या बातम्या जागावाटपांच्या चर्चा आणि नाराजी, बंडखोरीच्या बातम्या या नेहमीच निवडणूकांमध्ये येत असतात. पण यावेळी एकीकडे हे सारे होत असताना निवडणूक आयोग मात्र एक पक्ष असल्यासारखा वागताना दिसत आहे हे देखील नमूद करावे लागते. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम आहेत. त्यांच्याकडे शिवसेना उध्दव ठाकरे गटाने तक्रार केली की मशाल चिन्ह निट दिसत नाही त्यामुळे संभ्रम निर्माण होतो, त्याच्या बाजुलाच आईस्क्रिमचा कोन अशी निशाणी असलेल्या अपक्षाला चिन्ह असेल तर दोन्ही सारखेच भासते आणि चुकीचे मतदान होते, त्यावर हे चोक्कलिंगम महोदय सांगतात की आईस्क्रिमच्या कोन सारखी मशाल निशाणी दिसते हे तर्कच मुळात चुकीचे आहे, दुसरे कोणत्या चिन्हा जवळ कोणते चिन्ह यावे हे आयोगाच्या हातात नाहीच म्हणे! कारण काय तर अल्फाबेटीक म्हणजे उमेदवारांच्या नावानुसार हा क्रम असतो त्यामुळे त्यात त्याच पध्दतीने नावे आणि चिन्ह दिली जातात आणि तशीच ती मतदान यंत्रावर येतात! जी गोष्ट मशालची आहे तीच तुतारी वाजविणारा माणूस आणि पिपाणी यांच्यात आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाने तर थेट केंद्रीय आयोगाकडे याबाबत दाद मागितली सातारा सारख्या काही मतदारसंघात लोकसभेला या चिन्हांचा घोळ झाल्याचे पुरावे दिले मात्र या राजीवकुमार यांच्या मुख्य निर्वाचन आयोगाकडूनही हात झटकण्यात आले आहेत. असे बेदरकार वर्तन पूर्वी निवडणूक आयोगाकडून होत नव्हते. टि एन शेषन यांचा तर प्रश्नच नाही पण अन्य कोणत्याही आयोगाने राजकीय पक्षांच्या आक्षेपांनंतर इतक्या बेमुर्वतपणे दुर्लक्ष केले नव्हते.
त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही अजीत पवार (Ajit Pawar)आणि शरद पवार(Sharad Pawar) यांच्यातील आयोगाने चिन्ह आणि नाव वापरण्याबाबतच्या मुद्यावर तेरा महिन्यांपासून केवळ तारीख पे तारीख करण्यात आले आणि आता निवडणूकीचे अर्ज भरण्याचे केवळ काही दिवस बाकी असताना आता यावर काही निर्णय देणे योग्य होणार नाही असे सांगण्यात येत आहे. म्हणजे या देशाच्या संविधानिक व्यवस्थांचा कसा –हास झाला आहे असे म्हणायचे तर पूर्वीचे दाखले देवून तेंव्हाही कसे सारे अलबेल नव्हते असे सांगण्यात येत असते. मात्र तेंव्हा नसेलही अलबेल पण आपल्या कालखंडात तरी असायला हवे की नाही कारण आपण नॉनबायोलॉजिकल(Nonbiological) काळात आहोत, आपण कांग्रेजी नव्हेत ना? की त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरु मारणारच हा हट्ट किंवा हेका हेच आपले राजकीय शुध्दीकरणाचे त त्वाज्ञान असायला हवे? यातून देशाची व्यवस्था कलंकीत होत आहे. या महान देशात आपण येणा-या कालखंडात कोणते चुकीचे पायंडे क्षणिक तात्कालिक कारणाने पाडतो आहोत याचे ही भान या तथाकथित महाभागांना राहिले नाही हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. मराठीत म्हण आहे म्हातारी मेल्याचे दु:ख नाही मात्र काळ सोकावता कामा नये तसाच हा मुद्दा आहे, पण पुन्हा तेच लक्षात कोण घेतो?
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)