मुंबई : वरळीकरांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांना मोठ्या विश्वासाने आणि अपेक्षेने आमदार म्हणून निवडून दिले होते. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. तरीही त्यांनी वरळीकरांच्या समस्या सोडवल्या नाहीत. आमदार, मंत्री, पालकमंत्री म्हणून त्यांची कामगिरी म्हणजे भला मोठा शून्य यापेक्षा काहीही नाही. अशी टीका शिवसेना सचिव (शिंदे गट) सुशांत शेलार(Sushant Shelar) यांनी केली. शिंदे गटातून त्यांचे नाव आघाडीवर आहे.
कोविडकाळातही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनी अपेक्षाभंग केला. नागरिकांच्या लोकप्रतिनिधीकडून ज्या अपेक्षा असतात, ते त्या पूर्ण करू शकले नाहीत. पाच वर्षांत त्यांना साधे कार्यालय उघडावेसे वाटले नाही. निवडणुक आल्यावर पराभव दिसत असल्याने दोन महिन्यांपूर्वी त्यांनी कार्यालय उघडले, अशी सणसणीत टीका सुशांत शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. वरळीतल्या शिवसैनिकांनी आणि सर्वसामान्य मतदारांनी आदित्य ठाकरे यांना मोठ्या विश्वासाने निवडून दिले होते. मात्र ते आमदार, मंत्री, पालकमंत्री म्हणून साफ अपयशी ठरले आहेत. आता वरळीकरांना आपल्या समस्या सोडवू शकेल असा आपल्यातीलच एक लोकप्रतिनिधी म्हणून हवा आहे, असे शिवसेना सचिव सुशांत शेलार यांनी नमूद केले.
वरळीतून शिंदे गटातर्फे उमेदवारीसाठी सुशांत शेलार यांचे नाव आघाडीवर
वरळीत वर्तमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून कोणता उमदेवार असणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. यासाठी सुशांत शेलार यांचे नाव आघाडीवर आहे.
याबाबत सुशांत शेलार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “शिंदे साहेबांनी आदेश दिला तर नक्कीच निवडणूक लढवेन. कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला असे वाटते की, आपल्या लोकप्रतिनिधीने आपल्या समस्या सोडवाव्यात. पण नेमक्या या बाबतीत आदित्य ठाकरे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. मतदारसंघात असंख्य प्रश्न आहेत, जे सुटलेले नाहीत. वरळीकरांना आता त्यांचे प्रश्न सोडवू शकेल असा त्यांच्यातलाच एक सर्वसामान्य माणूस लोकप्रतिनिधी म्हणून हवा आहे. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन वर्षांपासून दररोज १८ ते २० तास काम करून राज्याचा विकास करत आहेत. त्यामुळे त्यांनी आदेश दिला तर नक्कीच निवडणूक लढविण्याची माझी ताकद आहे.”
सुशांत शेलार हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले आहेत. त्यांचे आजोबा आणि वडील कामगार होते. “आठ बाय दहाच्या घरात आमचे कुटुंब राहायचे. अशा परिस्थितीत मी घडलो आहे. शिवसैनिक म्हणून मी तळागाळातून काम केलं आहे. ९ वर्षांचा असताना लोकसभा निवडणुकीत वामनराव महाडिक यांचे पोस्टर लावण्याचे काम केले. दत्ताजी नलावडे तीनदा आमदार होते. त्यांच्या प्रचारात मी नेहमी असायचो. वरळीचा सर्वसामान्य नागरिक म्हणून ठाकरेंकडून माझा तसेच लाखो मतदारांचा अपेक्षाभंग झाला आहे. मला आमदार म्हणून संधी मिळाल्यास जनसामान्यांचे मूलभूत प्रश्न, त्यांच्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या समस्या सोडवण्याला माझे प्राधान्य असेल,” असे सुशांत शेलार यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे वरळीतील जनतेचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. कोळीवाड्यातील मच्छीमारांचे प्रश्न तातडीने सोडवायला हवे होते. त्यांच्या नौकांचा प्रश्न मार्गी लावायला हवा होता. शाळेचा राखीव भूखंड, जांभोरी मैदानाचा पुनर्विकास असे अनेक प्रश्न आहेत. आमदारांचे वडील दोन वर्षे मुख्यमंत्री असूनही ते आम्हा मतदारांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाताच त्यांनी आमचे अनेक प्रश्न मार्गी लावले. पुनर्विकासाच्या कामांमधील समस्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेत तातडीने सोडवल्या, असे यावेळी सुशांत शेलार यांनी आवर्जून सांगितले.