महायुती आणि महा आघाडीच्या उमेदवार याद्यांचा घोळ आणि सहयोगी पक्षांसोबतच्या जागावाटपाच्या तिढ्यात बंडखोरीच्या बागुलबुवाची मोठीच भुमिका सध्या सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना सतावते आहे. पळसाला पाने तीनच किंवा घरोघरी मातीच्या चुली अशी जी मायबोली मराठीत म्हण आहे तसे या सा-या पक्षांचे आणि नेत्यांचे झाले आहे. म्हणजे हे सारे समविचारी नसतीलही कदाचित पण समदु:खी मात्र नक्कीच आहेत असे म्हणायल हवे नाही का?
मग महायुतीचे कर्णधार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis)यांच्यात ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासाठी शिंदेसेनेच्या सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, अशी ‘विनंती’ एकनाथ शिंदे यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. पण सदा सरवणकर उमेदवारी मागे घेण्यास तयार नाहीत. “मनसेसाठी माघार नाही”, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. युती धर्म पाळावा यासाठी सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असा भाजपचा आग्रह आहे. पण सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
दुसरीकडे मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन या अपक्ष असल्या तरी त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना पाठिंबा दिला आहे. शिंदेंनी शिवसेनेत बंड पुकारले तेव्हाही त्यांनी त्यांच्याच बाजूने भूमिका घेतली होती. त्यामुळे गीता जैन यांनादेखील चर्चेसाठी वर्षा बंगल्यावर बोलावण्यात आले होते म्हणे. गेल्या निवडणुकीत जैन यांच्यासमोर भाजपकडून नरेंद्र मेहता हे उमेदवार होते. यावेळी त्यांच्याऐवजी आपल्याला भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी गीता जैन यांची मागणी आहे. त्यांनादेखील वर्षा येथील बैठकीनंतर ‘ वेट अँड वॉच’ चा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंडळी खरी गंमत पुढेच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या कोपरी-चपाखडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्या मतदारसंघात मनसेचे अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्याबाबतच्या चर्चा आहेत. महायुती चे मित्रपक्ष, आणि नेत्यांमध्ये मैत्रीपुर्ण संबंध असल्या कारणाने उमेदवार देताना काही ठिकाणी चर्चा सुरू असल्याचं चित्र आहे. मात्र मनसेच्या अमित ठाकरेंविरोधात शिंदेकडून सदा सरवणकर माघार घेत नसतील तर आता एकनाथ शिंदेंविरोधात अभिजित पानसेंना रिंगणात उतरवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे पुन्हा नाक दाबले की तोंड उघडते या मराठी म्हणीचा प्रत्यय येतोच की नाही?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या कोपरी-चपाखडी मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्या मतदारसंघात मनसेचे अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्याबाबतच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी अमित ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला तर शिंदेंविरोधात मनसे उमेदवार देणार नाही, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता शिंदेना सरवणकरांकडून माघारीचा पाठिंबा मिळणार की मग शिंदे समोर मनसे आपला उमेदवार देणार हे पाहणेही महत्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या पक्षाला त्यांच्या उमेदवार यादीत भाजपच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे केवळ जागाच नाहीत तर काही उमेदवार देखील दिले जात आहेत. म्हणजे कसे युतीचा धर्म आहे तर तो कसा शेवटपर्यत निभावला जायला हवा जागा, उमेदवार ही आम्हीच देवू त्याचा प्रचार कसा कुणी करायचा ते ठरवू, शिवाय काही साम दाम दंध भेद रसद लागलीच ती सुध्दा उपलब्ध करून देवू. म्हणजे ‘जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी’ असा हा महायुतीचा फेविकॉलचा मजबूत वादा आहे.
तरी देखील मुंबईत शिंदे यांच्याकडून शिवसेनेची दोन शकले केल्यांनतरही शिवसैनिकांमधून उमेदवार मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पक्षाने भाजप पुरस्कृत किंवा कॉंग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. महायुतीच्या यादीचा घोळ सुरुच असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक माजी शिवसैनिकांपेक्षा भाजप पुरस्कृत किंवा कॉंग्रेसच्या आजी-माजी नेत्यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. या कॉंग्रेसमधून आलेले संजय निरुपम, मिलिंद देवरा आणि भाजप पुरस्कृत समीर वानखेडे यांनी तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक रित्या समजते. तर अंधेरी मध्ये शिंदे यांनी भाजपकडून पोटनिवडणुकीच्या वेळी आयत्यावेळी माघार घेतली होती. आता तेच मुरजी पटेल शिंदेकडून धनुष्यबाण चिन्हावर रिंगणात आहेत.
शिवसेना शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. भांडुप विधानसभा येथून अशोक पाटील, विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सुवर्णा करंजे, धारावी मतदार संघातून समीर वानखेडे, वरळी विधानसभा येथून मिलिंद देवरा आणि दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून संजय निरुपम हे एकनाथ शिंदे यांचे संभाव्य उमेदवार असणार आहेत. शिंदेच्या शिवसेनेत सध्या भाजपमधून राजेंद्र गावित पालघर, निलेश राणे कुडाळ, संतोष शेट्टी भिवंडी, असे भाजपकडून आलेल्यांना संधी दिली जात आहे. तर नव्या मुंबईत शिंदेकडून विजय नाहटा यांनी साथ सोडली आहे. आणि विजय चौगुले गणेश नाईक या भाजपच्या बड्या नेत्यांविरोधात अर्ज भरत आहेत.
महायुतीच्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील विद्यमान जागांबाबत शेवटच्या क्षणापर्यत भाजपकडून चर्चा सुरुच राहिली होती. तोच प्रकार विधानसभा निवडणूक अर्ज भरायच्या शेवटांपर्यंत सुरु राहिल्याचे पहायला मिळत आहे. त्याचवेळी शिंदे यांच्या पक्षातील इच्छुकांपेक्षा आयत्यावेळी भाजप किंवा अन्य पक्षांकडून आलेल्यांना उमेदवारी देण्याचा ट्रेंड पहायला मिळत असल्याने तिकीट निश्चीत नसलेल्या शिंदेच्या निष्ठावंताची धाकधूक वाढली आहे.
दुसरीकडे महा आघाडीमध्ये ही ठाकरेसेना आणि दोन्ही काँग्रेसमध्ये १०-१२ जागांवर परस्पर उमेदवारी दिल्याने मतभेद उघड झाले आहेत. महाविकास आघाडीत काही जागांवरुन लोकसभेप्रमाणे सांगली पॅटर्न होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसमध्ये काही जागांवर दुहेरी उमेदवार देण्यात आल्याने मतभेद उघड झाले आहेत.
राजकीय नेत्यांच्या मुलांना, मुलींना, जावई, पुतण्यांना, भाच्यांना यावेळी उमेदवारीचा ट्रेंड जोरात आहे इतका की, भाजप महायुतीमध्ये बडे नेते रावसाहेब दानवे यांचा मुलगा भाजपकडून तर मुलगी शिंदे सेनेतून आहे. तसेच नारायण राणेंचे(Narayan Rane) आहे स्वत: भाजपचे खासदार एक मुलगा भाजपकडून दुसरा शिंदे सेनेकडून, त्यावर कडी भाजपचे गणेश नाईकांच्या कडून आहे. स्वत: भाजपकडून तर मुलगा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढत आहे. या सगळ्यात गंमत शरद पवारांच्या पक्षात आहे घोटाळ्याचे आरोप आहेत म्हणून रमेश कदम यांच्या मुलीला शप राष्ट्रवादीत उमेदवारी मिळाली आहे. तीच गोष्ट अप राष्ट्रवादीत नबाब मलिक यांची आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने मुलगी सना अजित पवारांच्या पक्षातून लढत आहे. तर काटोलमध्ये अनिल देशमुख यांना शरद पवारांकडून तिकीट जाहीर होवूनही अर्ज मात्र मुलगा सलिल दाखल करत आहे. अशी ही ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ ची उध्दव ठाकरेंची कोविडकाळातील घोषणा सगळ्याच राजकीय पक्षांना आवडल्याचे दिसत आहे. स्वत: ठाकरेंच्या घरात आता निवडणूका न लढवण्याची बाळासाहेबाची परंपरा मोडी(दी नव्हे)त काढून मुलानंतर आता ठाकरेंचा भाचा आणि आता पुतण्यासुध्दा निवडणूकीच्या रिंगणात आहे.
तर लोकसभेत महाविकास आघाडी एका जागेवर सांगलीत मतभेद झाले होते. दोन उमेदवार आघाडी ने दिले होते. हा सांगली पॅटर्न आता तीनही पक्षांकडून दुहेरी उमेदवार जाहिर झाल्याने १० ते १५ ठिकाणी दिसून आला आहे त्यावरुन आता वाद होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसमध्ये काही जागांवर मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहेत.
मुंबईतील ४ ते ५ जागी ठाकरेंच्या शिवसेनेने इतक्या दिवस बैठका होवूनही चर्चा न करताच उमेदवार जाहीर करून AB फॅार्म वाटले आहेत. तर महाराष्ट्रातही ७ ते ८ ठिकाणी चर्चा न करता उमेदवार जाहीर करून AB फॅार्म दिले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये १०-१२ जागांवरील मतभेद उघड झाले आहेत. चर्चा न करताच शिवसेना ठाकरे गटानं परस्पर उमेदवार दिल्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे . या जागांवर काँग्रेसनेही उमेदवार तयार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वादग्रस्त जागांवर काँग्रेसही आपल्या उमेदवारांना AB फार्म देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या परांडा या जागेवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या समोरही ठाकरे गट आणि पवार गट दोघांचे उमेदवार जाहीर झाल्याने तेथील पेच समोर आला आहे. म्हणजे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत एकत्रित शिवसेना व भाजपा युती होती.त्यातही मोदींचा वरचष्मा होता. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघापैकी भाजपा १६ व शिवसेना १४ जागी विजयी झाली. काँग्रेस ४ राष्ट्रवादी १ समाजवादी १.
दोन शिवसेना निर्माण झाल्या त्यात उबाठा ८ व शिंदे ६ आमदार राहिले. राष्ट्रवादीचा एकुलता एक आमदार व काँग्रेसचा एक आमदार अजित पवारांकडे गेला.
महाविकास आघाडीतील उबाठा आणि काँग्रेस मध्ये एक जागा अदलाबदल चांदिवली काँग्रेसला तर वांद्रे पूर्व उबाठाला. तरी उबाठाच्या १४ जागा झाल्या . काँग्रेस ४ वर राहिली आहे. मात्र महाआघाडीने भाजपाकडच्या विजयी झालेल्या १६ जागाच खरे तर वाटून घ्यायला पाहिजे होत्या असे आता काही लोक म्हणत आहेत. त्यातील एक राष्ट्रवादी( शप) घाटकोपर पूर्व. काँग्रेस ला चारकोप , कांदिवली पूर्व, अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम, सायन कोळीवाडा, कुलाबा अशा ६ जागा. तर उबाठा ने दहिसर, बोरीवली, गोरेगाव, वर्सोवा, विलेपार्ले, वडाळा, मलबार हिल, घाटकोपर पश्चिम या ८ जागा घेतल्या. मुलुंड बद्दल अजुन निर्णय झाला नाही.
मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्य़ात ६ पैकी ५ जागा उबाठा दिल्या. इथे उबाठाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे तीन/ तीन जागांचे वाटप होणे आवश्यक होते. वर्सोवा सारखी काँग्रेसची जागा उबाठाने हिरावून घेतलीच पुन्हा मुस्लिम उमेदवार दिला आहे. काँग्रेस नेत्यांना सुनील दत्त, प्रिया दत्त,गुरूदास कामत यांनी नेतृत्व केलेल्या जिल्हयात काँग्रेसला संपविण्याचे हे महान कार्य कोणी केले? काँग्रेस कार्यकर्त्यांची गळचेपी केली.असा सवाल आता केला जात आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईतून खासदार झाल्या. तिथे काँग्रेस फक्त दोन जागा लढतोय आणि उबाठा ४.जागा लढत आहे. मुंबई दक्षिण मध्य जिल्हयात काँग्रेस २ जागा लढतेय धारावी व सायन कोळीवाडा. उबाठा ३ राष्ट्रवादी (शप) १. दक्षिण मुंबईत काँग्रेस २ उबाठा ४ . ईशान्य मुंबईत उबाठा ३, चौथी लढण्याची शक्यता, राष्ट्रवादी (शप) १ समाजवादी १. इथे उबाठाचा खासदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिंकून आला त्याची परत फेड केली जात आहे . मात्र उबाठाने काँग्रेसची मुस्काटदाबी केली आहे अशी समस्त काँग्रेसजनांची भावना आहे. दोन दिवस अजुनही आहेत. वर्सोवा व घाटकोपर (पश्चिम) वडाळा या जागा काँग्रेस कडे राहणार का? चार तारखेनंतर रिंगणात कोण राहणार? लढत कुणाची होणार? आणि रडत कोण राहणार? पाहूया मतदार आता नेमक्या कुणाला मतदान करतात.!
किशोर आपटे
लेखक व राजकीय विश्लेषक
‘बचेंगे तो और भी लडेंगे’ चा इतिहास असलेल्या महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ चा दुहेरी अर्थ ?