वनगांच्या अश्रूतून शिंदेंचे दु:ख ज्यांना दिसले आहे, त्यांनाच हे समजू शकेल नाही का?!

महाराष्ट्राचा महासंग्राम केंद्रात आणि राज्यातही सत्ताधारी एनडीए म्हणजेच ट्रिपल इंजन(Triple engine) वाली महायुतीसाठी अस्तित्वाची निवडणूक आहे. त्यामुळेच या निवडणूकीला उशीराने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे काय? तर जसे सोपे प्रश्न आपण परिक्षेत आधी सोडवतो आणि कठीण प्रश्नांवर नंतर वेळ देतो अगदी तसेच! तर महायुतीच्या या ‘ट्रिपल डोस’ असलेल्या सरकारने निवडणूक आयोगालाही वश केले आहे म्हणे. कारण निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी उशीर झाला कारण दोन वर्षात निवडणूक जाहिर होण्यापूर्वी अगदी राज्यपालांच्या अभिभाषणातही नसलेल्या काही तर राज्याच्या अर्थसंकल्पातही नसलेल्या योजनांसाठी सरकारकडून सव्वालाख कोटींच्या थेट लाभाच्या योजना जाहीर केल्या आणि राबविल्या देखील! इतक्या ज्या नोव्हेंबर महिन्यात आचारसंहिता लागली आहे त्या महिन्याचे आगावू(पणे नाही हं) थेट अनुदान या सरकाने अग्रिम म्हणून देवून टाकले आहे. आता निवडणूक आयोगाने या सा-या योजना थांबवल्या आहेत, त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यत लाडक्या बहिणींना गुलाबी कपडे घालून भेटण्याची दोन उपमुख्यमंत्री आणि एका मुख्यमंत्र्यामध्ये जी चढाओढ लागली होती ती थांबली आहे.

देवेंद्र-फडणवीस
सर्वात महत्वाचे म्हणजे २०२२ मध्ये राज्यात सुरू असलेल्या महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग भंग करत ज्या एकनाथ शिंदे यांच्या शिडात हवा भरून त्यांना सुरत, गुवाहाटी, गोवा ते मुंबई ५० आमदारांसोबत आणण्यात आले, आणि उध्दव ठाकरेंच्या नाकावर टिच्चून मुख्यमंत्री करण्यात आले त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाचा अधिकृत पक्षाचा दर्जा असूनही ठाकरेंशी युती असताना जी किंमत होती ती देण्यात येत नाही. २०१९मध्ये ठाकरेंशी धरून बांधून बंद खोलीत चर्चा करून जी युती केली गेली त्यावेळी सुध्दा त्यांना १२५ जागा देण्यात आल्या होत्या. मात्र २०२४मध्ये त्यांच्या त्याच तथाकथित शिवसेनेला अयोगाची अधिकृत मान्यता असताना चिन्ह आणि नाव असताना केवळ ८५ जागांवर बोळवण करण्यात आली आणि त्यातही दहा जागांवर स्वत:च्या माणसांना तर दहा जागा मनसेसाठी सोडण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात या निवडणुका लढत आहोत असे वारंवार भाजप आणि राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत असले तरी शिंदे यांना तो मानसन्मान या महायुतीत नाही जो पूर्वीच्या भाजप सेना युतीमध्ये उध्दव ठाकरेंना निदान वरकरणी तरी दिसत होता.

उद्धव-ठाकरे
आता मनसेच्या चवथ्या इंजनला (काही लोकांच्या मतानुसार बंद पडलेल्या) देखील सोबत घेत राज्यातील ट्रिपल इंजन महायुतीने निवडणूक जिंकण्यासाठी नव्याने एका ठाकरे ब्रँण्डला जोडून घेण्याचा प्रयोग करायचे ठरवले आहे. याचे कारण देखील शिवसेना सोबत असली तरी ठाकरे सोबत नसल्याने लोकसभा हरल्याचे वास्तव हेच आहे म्हणे! कसे कसे हुश्शार लोक यांच्याकडे आहेत आणि ते किती अगाध विचार करतात आणि राजकीय संशोधन करतात तेच यावरून लक्षात येते की नाही.

देवेंद्र-फडणवीस
तर मग शिवसेना सोबत आहे पण शिंदेकडे आहे, त्यात ठाकरे नाहीत म्हणून ‘म’नसेच्या पाठिंब्यासाठी देखील आटापिटा करण्यात येत आहे. त्यात या नव्याने सोबत घेतलेल्या ठाकरेना देखील सध्या पूत्रप्रेमासाठी निवडणूक मैदानातही उतरविण्यात आले आहे. या मध्येही आग्रह असा की, गेल्या दोन वर्षात शिवसेनाभवन जे कब्जात घेण्याचा धीर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना सारा पक्ष आणि चिन्ह सत्ता आणि पद दिल्यानंतरही झाला नाही त्या शिवसेना भवन जेथे आहे अश्या माहिम मतदारसंघावरच नव्या ठाकरेंच्या माध्यमातून कब्जा करायचा! मग मनसेच्या मुख्य नेत्याच्या मुलासाठी शिंदेच्या पक्षाला माघार घेण्यास लावण्याचा दबाव घालण्यात येत आहे. पण तेथे कॉंग्रेसमध्ये जावून आलेल्या आणि मनसेकडून २००९मध्ये एकदा पराभूत झालेल्या शिंदेच्या सदा सरवणकर यांना माघार घ्या सांगण्यात आले तरी त्यांना माघार घ्यायची नसल्याने मुख्यमंत्री शिंदे देखील त्यांच्यावर फार काही लक्ष न देता त्या जागेवर कार्यकर्त्यांवर निर्णय सोडून मोकळे झाले आहेत. म्हणजे जुन्या ठाकरेंना त्यांच्या पूत्रप्रेमामुळे सोडून आलेल्या शिंदेना आता नव्या ठाकरेंच्या पूत्रप्रेमाचे साकडे घालून नव्याने त्याच धर्मसंकटात भाजपने आणून सोडले आहे की नाही!? अश्या राजकीय गंमती फक्त येथेच होवू शकतात बरे!

अमित-शहा
तर एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता महायुतीला विजयी करण्याचे आव्हान आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे प्रशासकीय अधिका-यांशी असणारे संबंध त्यासाठी त्यांना कामी येणार का हा वेगळाच मुद्दा आहे.पण मुख्यमंत्री शिवसेना पक्षांचा अधिकृत नेता असूनही भाजपने त्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून किंवा महायुतीचा चेहरा म्हणून घोषणा केली नाही ही रूख रूख त्यांना लागून राहिली आहे. त्यात मनसेच्या नव्या ठाकरेंनी एका दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमाचे निमित्त साधून नवे सरकार भाजपच्या  नेतृत्वात येणार आणि फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे जाहीर करून टाकले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष तर केला आहेच पण देवाभाऊंच्या मी पुन्हा येईनचा नारा वेगळ्या स्वरुपात नव्या ठाकरेंनी दिला आणि तसे कटाऊट नागपूरात लागले आहेतच शिवाय स्वत: फडणवीस यांनी व्टिट करत आपल्या या ‘पुन्हा येईना’ च्या वस्तुस्थितीला ‘पुन्हा येईन’ मध्ये स्वारस्य असल्याचे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री शिंदेच्या पक्षाचे अनेक बंडखोर रिंगणात आहेत, तसेच भाजपचे देखील काही बंडखोर आहेत. राष्ट्रवादीच्या तर मुंबईच्या अध्यक्षांनी पदाचा राजीनामा देवून नाशिक जिल्ह्यात नांदगावात महायुतीच्या शिंदेच्या उमेदवाराला नाकाने कांदे सोलत असल्याने कांदेभजी तळायची स्थिती आणली आहे म्हणे!


एकूण काय मुख्यमंत्री शिंदे समोर महायुतीच्या दोन्ही सहयोगी पक्षांचे तगडे आव्हान आहे, परतीचे दोर केंव्हाच कापून टाकले आहेत, स्वत:च्या मतदार संघात ज्या आनंद दिघे यांच्या नावाचे राजकारण केले त्या दिघेंचा पुतण्याच आव्हान देत आहे. अश्या तिहेरी पेचात पकडण्यात आले आहे. या सा-या स्थितीत देखील ते सात तारखेपासून भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. मुख्यमंत्रीपदावर पुन्हा येईन असे जरी ते म्हणत नसले तरी तेथ पुन्हा आलो नाही तर काही खरे नाही हे ओळखूनच त्यांची वाटचाल सुरू आहे. शिंदे सोबत गुवाहाटीला गेलो, तरी तिकीट दिले नाही असे म्हणत त्यांच्याच पालघरच्या एका आमदाराने निष्ठेची नवी उदघोषणा देखील रडत रडत केल्याचे पहायला मिळाले आहे. अशीच निष्ठा माहिमच्या सरवणकरांनी दाखवली आहे, गुवाहाटीला जाताना दिेलेल्या शब्दांची आठवण त्यांनी शिंदेना करून दिली आहे त्यामुळे शिंदेना आपल्या सहका-यांना नाराजही करता येत नाही.

Eknath-Shinde
निवडणूकीत लाडक्या बहिणींवर त्यांची भिस्त आहे.पण त्या योजनेसाठी त्यांच्या मित्रपक्षांकडूनही श्रेय घेतले जात आहे. इतके की, त्यांच्या योजनेतून मुख्यमंत्री शब्दही काही वेळा बाजुला ठेवला जातो तर काही मित्रपक्षांचे नेते स्वत:ला ‘देवाभाऊ’ म्हणुन प्रोजेक्ट करताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादीच्या एका रांगड्या नेत्यासाठी ‘गुलाबी जॅकेट’ घालून दसरा दिवाळी आली तरी महिलांच्या मेळाव्यात राखी बांधायचा इव्हेंट मँनेज केला जात आहे. त्यामध्ये एका मित्राने प्रश्न केला की, बहिणीला भेटायला कुणी गुलाबी कपडे घालून जातो का? गुलाबी कपड्यांचा काय संबंध? हा काही व्हॅलेंटाईन साजरा केला जात आहे का? पण असे प्रश्न विचारू नका, आले आरोरांच्या मना तेथे कुणाचे चालेना! असे दुस-या मित्राने सांगितले म्हणे!

Eknath-Shinde
तर…  अश्या या शिंदे सरकारच्या दोन वर्षानंतरच्या राजकीय कहाणीचा निवडणूक अध्याय रंगात आला आहे. त्यांच्या मुख्यनेते शिंदेना जेमतेम ६०-६५ जागांवर समाधान मानावे लागत आहे, त्यातील निम्म्या देखील निवडून आणायचे कसब त्यांनी दाखवले तरी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्याची शाश्वती नाही. कारण त्यांच्यावर कुरघोडी करणा-या भाजपने या ना त्या प्रकारे सुमारे १७५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत पुन्हा वीस एक जागांवर गुपचूप पुरस्कृत बंडखोर उभे करत आपल्याला निवडणूक निकालानंतर शंभर आमदारांचा पाठिंबा मिळावा अशी तजबीज केली आहे म्हणे! भाजपच्या पुन्हा येईनच्या मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून जे काही झाले, त्याचाच पुढला अध्याय आताही होत आहे, त्यात मुख्यमंत्रीपदावर च्या शिंदे यांची राजकीय स्थिती मात्र पठ्ठे बापूराव सांगून गेले तशी ‘बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. अरे कष्टाची खा भाजी भाकरी तूपसा्खरेची चोरी नको” अशीच झाली आहे. त्यांना हे आता उमगले आहे, सध्या मात्र वनगांच्या अश्रूतून शिंदेचे दु:ख ज्याना दिसले आहे त्यांनाच हे समजू शकेल नाही का?!

हेही वाचा – अजितदादांच्या परतीच्या प्रवासाची ही सुरूवात म्हणायची काय?

किशोर आपटे
(राजकीय विश्लेषक)
Social Media