तोतरेपणा(stuttering) म्हणजे बोलताना अडखळणे. अशा स्थितीत लोक इतर लोकांप्रमाणे अस्खलीत, न अडखळता बोलू शकत नाहीत. कधी-कधी बोलताना तोतरे असणारे लोक गाताना मात्र अडखळत नाहीत. त्यामुळे तोतरेपणा बोलताना आहे की गाताना हे समजून घेतले पाहिजे. ९८ टक्के लोक बोलतानाच तोतरे असतात.
तोतरेपणा(stuttering) हा प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगळा असतो.
त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे –
अनुवांशिक (Genetic)–
कधी-कधी तोतरेपणा हा पालकांकडून त्यांच्या जिन्सद्वारे मुलांकडे येतो.
अनुकरण(Imitation) –
लहान मुलांनी इतरांचे अनुकरण केल्यानेही ही समस्या उद्भवते. एखाद्या मुलाने तोतऱ्या व्यक्तीची नक्कल किंवा अनुकरण केले तर कालांतराने ते मूलही तोतरे बोलण्याची शक्यता असते.
तणाव(stress) –
मानसिक तणावामुळेही बोलण्यात दोष निर्माण होऊ शकतो आणि बऱ्याचदा मुलाखतीच्या वेळी तणावामुळे व्यक्ती अडखळत बोलते.
न्यूरोलॉजिकल समस्या (Neurological problems) –
कधी-कधी अपघाताने मेंदूला दुखापत होते. परिणामी मेंदूतील बोलण्यासाठीच्या असलेल्या केंद्रात बिघाड होतो. त्यामुळे वाणी दोष उत्पन्न होतो.
न्युनत्वाची भावना (Feeling of inferiority)–
मनात न्युनत्वाची भावना असेल तर अशा प्रकारची बोलण्यातील समस्या निर्माण होते. समजा मुलाची त्याच्या वर्गमित्रांनी सारखी चेष्टा केली किंवा पालक आणि शिक्षक मुलावर वारंवार ओरडले तर मुलाच्या मनात भीती येते आणि मग तो अडखळत बोलू लागतो.
कुठल्या वयात येतो तोतरेपणा(stuttering) ?
ही समस्या बऱ्याचदा लहानपणी किंवा पौगंडावस्थेत निर्माण होते.‘साधारण अडीच ते चार वर्षातली मुले भाषा आत्मसात करत असताना अडखळतात. ते सर्वसामान्य असते. पालकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की या वयातील मुलांवर स्पष्ट बोलण्याची जबरदस्ती करू नये. हे अडखळणे आपोआप जाते. पण ही समस्या ४ वर्षानंतरही राहिली तर मात्र पालकांनी वाणी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला उशीर करू नये.’
हे समजून घेणे गरजेचे आहे की, लहानपणी बोलण्यातील दोष दूर केला नाही तर पुढे जाऊन त्यावर उपचार करणे कठीण जाते. थोडे का होईना तोतरेपणा हा राहतोच. म्हणूनच हा दोष लवकर ओळखणे आणि त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.
नक्की या समस्येत काय होते ?
साधारण लोक सुरुवातीच्या अक्षरावरच अडखळतात. उदाहरणार्थ, पुन्हा पुन्हा तोच शब्द उच्चारणे – प प प प प पेन, प्रदीर्घ उच्चार म………..दर. बोलताना मधेच बराच वेळ थांबणे मी पुस्तक…. ( बराच वेळ थांबणे ) वाचत आहे. पुन्हा पुन्हा तोच शब्द बोलणे मी…मी….मी अभ्यास करत आहे. बोलताना शब्द किंवा वाक्याच्यामध्ये आवाज काढणे, मी (अंअंअंअं) खेळायला (अंअंअंअं) जात आहे.
म्हणूनच बोलण्यातील दोष लहानपणीच कळला तर त्यावर योग्य स्पिच थेरपी घेऊन तो पूर्णपणे जाऊ शकतो. याला उशीर झाला तर मात्र, आयुष्यभर या समस्येला तोंड द्यावे लागेल. याशिवाय सर्वसाधारण व्यक्तींना तोतरेपणाबद्दल माहिती हवी आणि तोतरे बोलणाऱ्यांची थट्टा कोणी करू नये. किंवा त्या व्यक्तीकडे दुर्लक्षही करू नये. त्यांना समानतेची वागणूक द्यावी. शिवाय तोतरे बोलणाऱ्याला संवादासाठी प्रोत्साहन द्यावे आणि अडखळत बोलणाऱ्याचे संयतपणे ऐकून घ्यावे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
पुजेसाठीचा कापूर आहे बहुगुणी, या शारीरिक समस्या काही दिवसांत होतील गायब